esakal | हाथरस प्रकरण दडपण्याचा प्रयत्न काँग्रेस यशस्वी होऊ देणार नाही
sakal

बोलून बातमी शोधा

Hathras case is being suppressed by Uttar Pradesh government

काँग्रेस त्या पीडितेला व तिच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी संघर्ष करीत असून, हा लढा न्याय मिळेपर्यंत सुरुच राहिल असेही थोरात म्हणाले.

हाथरस प्रकरण दडपण्याचा प्रयत्न काँग्रेस यशस्वी होऊ देणार नाही

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर ः उत्तर प्रदेशातील हाथरस येथील दलित मुलीवरील सामूहीक बलात्कार व हत्या प्रकरणी भाजपा सरकार पहिल्या पासूनच संशयाच्या फेऱ्यात सापडले आहे. पीडित कुटुंबाला कोणालाही भेटू दिले गेले नाही.

विरोधी पक्षाचे नेते व माध्यमांना प्रतिबंध करुन योगी सरकार कोणाला तरी वाचवण्याचा आटापीटा करीत आहे. हाथरस प्रकरणी योगी आदित्यनाथ सरकारची भूमिका संशास्पद असून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

आज मुंबईत त्यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर झालेल्या राज्यव्यापी सत्याग्रह आंदोलन प्रसंगी ते बोलत होते. 

ते म्हणाले, उत्तर प्रदेशातील घटना अमानवीय असून, योगी आदित्यनाथ व उत्तरप्रदेश पोलिसांनी केलेल्या कृत्याचा निषेध म्हणून सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. दलित मुलगी आणि तीच्या कुटुंबावर झालेल्या अन्यायाविरोधात आवाज उठविण्याचा प्रयत्न राहुल आणि प्रियांका गांधी करीत असताना, उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी त्यांना दिलेली वागणूक आक्षेपार्ह व निषेधार्ह आहे. हे प्रकरण दाबण्यासाठी भाजपाचे स्थानिक नेते व माजी आमदार आरोपींच्या समर्थनार्थ बैठका घेत आहेत.

पोलिस बळाचा वापर करुन पीडित कुटुंबाला समाजापासून वेगळे पाडण्यात आले आहे. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण अत्यंत निष्काळजीपणे हाताळले आहे. आताही त्यांनी विरोधकांना दंगली घडवायच्या आहेत असा हास्यास्पद आरोप करुन मूळ घटनेवरून लक्ष वळवण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपच्या राज्यात दलित, अल्पसंख्याक, महिला यांच्यावरील अत्याचार वाढले असून त्यांच्यावर आता कोणाचाही विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे हाथरस प्रकरणाची न्यायालयीन चौकशी सुप्रीम कोर्टामार्फत करावी आणि हाथरसच्या जिल्हाधिकाऱ्यावर कारवाई करावी या काँग्रेसच्या मागण्या आहेत.

काँग्रेस त्या पीडितेला व तिच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी संघर्ष करीत असून, हा लढा न्याय मिळेपर्यंत सुरुच राहिल असेही थोरात म्हणाले.

यावेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख, गृह राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, हुसेन दलवाई, आमदार भाई जगताप, आमदार अमिन पटेल, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत, यशवंत हाप्पे, सचिव राजाराम देशमुख, झिशान अहमद, नितीन पाटील, मुनाफ हकिम यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

पुणे, नांदेड, कोल्हापूर, नाशिक, नागपूर, बुलढाणा, यवतमाळ, सिधुदुर्ग, रत्नागिरी, लातूर, परभणी, भिवंडी, अकोला यासह राज्यभरातल्या सर्व जिल्ह्यांत सत्याग्रह आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

संपादन - अशोक निंबाळकर