आरोग्य यंत्रणेने आराखडा तयार करावा : डॉ. भोसले 

अमित आवारी
Saturday, 28 November 2020

जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था बळकटीकरणासाठी विविध योजनांची अंमलबजावणी योग्य रितीने करण्यावर भर द्यावा.

अहमदनगर : जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था बळकटीकरणासाठी विविध योजनांची अंमलबजावणी योग्य रितीने करण्यावर भर द्यावा. रुग्णांच्या सोयीसाठी, त्यांच्यावरील उपचारासाठी आवश्‍यक बाबींची पूर्तता करावी. त्यासाठी आरोग्य यंत्रणेने जिल्ह्याचा सर्वंकष आराखडा तयार करावा, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केली. 

जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, तसेच इतर आरोग्य यंत्रणांशी संबंधित विषयांचा डॉ. भोसले यांनी आढावा घेतला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप शेळके, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल बोरगे, राज्य होमिओपॅथिक कौन्सिलचे सदस्य डॉ. अजित फुंदे आदी उपस्थित होते. 

रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयांपर्यंत पोचविण्याची व्यवस्था, आजाराचे लवकर निदान, औषध उपलब्धता आणि आहार, या चार गोष्टी आरोग्यसेवेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असतात. त्या दृष्टीने आरोग्य संस्थांचे बळकटीकरण आवश्‍यक आहे. विविध योजनेतील कार्यक्रमाची अंमलबजावणी करताना त्याचा लाभ रुग्णांना व्हावा, असे डॉ. भोसले यांनी सूचविले. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The health system should prepare a plan