विजांचा कडकडाट, सुसाट्याचा वारा; अक्राळ- विक्राळ रूप धारण करीत कर्जत तालुक्यात रात्रभर पाऊस

नीलेश दिवटे
Sunday, 11 October 2020

विजांचा कडकडाट, सुसाट्याचा वारा, टपोरे थेंब असे अक्राळ- विक्राळ रूप धारण करीत रविवारीमध्य रात्री परतीच्या पावसाने निरोप घेत तालुक्यात रात्रभर आकांड- तांडव केले.

कर्जत (अहमदनगर) : विजांचा कडकडाट, सुसाट्याचा वारा, टपोरे थेंब असे अक्राळ- विक्राळ रूप धारण करीत रविवारीमध्य रात्री परतीच्या पावसाने निरोप घेत तालुक्यात रात्रभर आकांड- तांडव केले.

यामध्ये तालुक्यातील शेकडो हेकटर फळबागा, खरिपातील पिके व रब्बीची नुकतीच पेरणी केलेली पीक जमीनदोस्त झाली. याबाबत वस्तुनिष्ठ पंचनामा करीत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

शनिवारी सायंकाळपासून तालुक्यात पावसाने सुरुवात केली होती. सुरुवातीला हलका वाटणाऱ्या पावसाने काही मिनिटात उग्र रूप धारण केले. विजांचा कडकडाट, सुसाट्याचा वारा आणि टपोरे थेंब घेत रात्रभर धुमाकूळ घातला. या तडाख्यात डाळिंब, लिंबू, सीताफळसह फळबागा तर खरिपातील तूर, कपाशी, मका आणि ऊस पिके भुईसपाट झाले.

यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या घास निसर्गाच्या प्रकोपात हिरावून नेला. रब्बीची नुकतीच पेरण्यात आलेली ज्वारीच्या पिकाला बाधा पोहोचली आहे. दिवसभर उभे असलेले पीक सकाळी सपाट झालेलं होत हे दृश्य डोळ्यात पाणी आणीत शेतकरी पाहत होते.

पावसामुळे नुकसान झाले आहे. त्याबाबत राज्यशासन व लोकप्रतिनिधी म्हणून मी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. शेतकऱ्यांनी काळजी करू नये. मात्र येत्या 14 तारखेपर्यंत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून काळजी घ्या. याबाबत तातडीने दखल घेत संबंधितांना नुकसानीची पाहणी करीत पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत, असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.

संबंधित गावातील तलाठी व कृषी सहायक यांना नुकसानीची प्राथमिक पाहणी करीत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. वरिष्ठ पातळीवरून आलेल्या आदेशानुसार उचित कार्यवाही करण्यात येईल, असे तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी सांगितले.

राशीन मंडळात सर्वाधिक तर कोंभळी मंडळात सर्वात कमी पाऊस झाला आहे.
तालुक्यातील मंडळ निहाय पर्जन्यमापकवर काल नोंदविण्यात आलेला पाऊस 
(कंसात एकूण) मिलीमीटरमध्ये पुढीलप्रमाणे...

  • - कर्जत-98.0  (765.1)
  • - माही-    65.0  (695.0)
  • - कोंभळी-    5.0 (609.5)
  • - राशीन-     132.0 (837)
  • - भांबोरा-    67.0  (662.5)
  • - मिरजगाव-    23.0  (705.0) 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rain in Karjat taluka on Sunday