गाड झोपेत असतानाच पहाटे दोनच्या सुमारास थेट घरात घुसले पाणी अन्‌...

आनंद गायकवाड
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

आश्वी गटात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतातील वस्तीवरील घरात मध्यरात्रीनंतर अचानक घुसलेल्या पाण्यामुळे एका कुटूंबातील संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले आहे.

संगमनेर (नगर) : बुधवारी आश्वी गटात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतातील वस्तीवरील घरात मध्यरात्रीनंतर अचानक घुसलेल्या पाण्यामुळे एका कुटूंबातील संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले आहे.

यावर्षी पावसाने चांगलाच जोर धरल्याने संगमनेर तालुक्यातील बहुसंख्य गावातील जलस्तर वाढला आहे. काही दिवसातील पावसाची सरासरी पाहता आश्वी गटात अतिवृष्टी झाल्याचे दिसते. संततधार पडणाऱ्या पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी असलेले, पूर्वांपार ओढे नाले त्यांचे अस्तित्व हरवून बसल्याने, पावसाचे पाणी वाट मिळेल तेथून पुढे जाते. परिणामी वाटेत आलेल्या शेतीमालाची मोठ्या प्रमाणात हानी होते. गेल्या काही वर्षात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यात शेतकरी वर्गाची जमिनीच्या तुकड्याची हाव यामुळे गावातील कधी काळी वाहते असलेले ओढे, नाले केवळ कागदोपत्रीच उरले आहेत. सार्वजनिक वाहतुकीच्या रस्त्याच्याकडेच्या साईड गटारीही अतिक्रमीत झाल्याने नैसर्गिक आपत्ती आल्यास पाणी वाहून जाण्यासही मार्ग उरला नाही. 

आश्वी बुद्रूक येथे निमगावजाळीकडे जाणाऱ्या मधल्या रस्त्यावर प्रत्येक पावसाळ्यात पाणी तुंबते. या वर्षी नेहमीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने, रस्त्याने वाहणारे पाणी उत्तरेला असलेल्या चाँदशहावली बाबा दर्ग्याजवळच्या वस्तीत घुसले. रात्री दोनच्या सुमारास थेट घरात आलेल्या पाण्यामुळे इक्बाल शेख यांच्या घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य खराब झाले आहे. आजही त्यांच्या घरात व आसपास सुमारे गुडघाभर पाणी आहे.

हे पाणी काढून देण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा चर खोदण्याचे काम ग्रामपंचायतीने हाती घेतले आहे. मात्र या ओढ्याची नोंद कुठेही आढळत नसल्याने सर्वांना पेच पडला आहे. रहिवाशी वस्ती नसलेल्या ठिकाणी चर खोदले असले तरी, प्रवरा डाव्या कालव्याच्या दक्षिणेला रस्त्याच्या कडेला काही रहिवाशी वस्त्या असल्याने, अनेक ठिकाणी पूर्वीचे चर बुजले आहेत.

आज ग्रामपंचायतीचे सरपंच महेश गायकवाड, उपसरपंच राहुल जऱ्हाड, पंकज कोळपकर आदींसह मंडलाधिकारी श्रीमती एस. ए. चतुरे, तलाठी संग्राम देशमुख, ग्रामविकास अधिकारी रमेश भालेराव, तंटामुक्तीचे अध्यक्ष भाऊसाहेब गायकवाड आदींसह सदस्यांनी या कामाची पहाणी केली. रस्त्याच्या दुतर्फा पाणी वाहुन जाण्यासाठी मोठे चर खोदण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

 

परवाच्या पावसामुळे आमच्या संसारातील चिजवस्तू खराब झाल्या आहेत. अद्यापही घरात पाणी आहे. प्रशासनाने आर्थिक मदत द्यावी तसेच पाणी काढून देण्यासाठी पंपाचा वापर करुन आम्हाला दिलासा द्यावा. 
- इक्बाल शेख, आश्वी बुद्रूक 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains in Ashvi Budruk in Sangamner taluka