esakal | लंकेंच्या कोविड सेंटरसाठी देश-विदेशही धावला

बोलून बातमी शोधा

नीलेश लंके यांचे कोविड सेंटर
लंकेंच्या कोविड सेंटरसाठी देश-विदेशही धावला
sakal_logo
By
टीम ई सकाळ

पारनेर : आमदार नीलेश लंके यांनी भाळवणी येथील नागेश्‍वर मंगल कार्यालयात सुरू केलेल्या शरदचंद्र पवार आरोग्य मंदिरासाठी देश-विदेशातून मोठया प्रमाणात मदतनिधी मिळत आहे. आतापर्यंत ५० लाख रूपयांहून अधिक रक्कम जमा झाली आहे. या शिवाय गावागावांमधून दुध, धान्य, भाजीपाला, फळे, अंडी आरोग्य केंद्रामध्ये भेट म्हणून दिली जात आहेत.

सोशल मीडियाच्या माध्यमातून लंके यांच्या मोफत आरोग्य केंद्रांची महती देशासह सातासमुद्रापार पोहोचल्यानंतर मदतीचा ओघ सुरू झाला आहे. नीलेश लंके प्रतिष्ठानच्या सेंट्रल बँकेतील खात्यावर अनेक नागरीक थेट मदत पाठवित आहेत. गुगल तसेच फोन पेच्या माध्यमातूनही दररोज लाखो रूपयांची मदत जमा होत आहे. या मदतीची संबंधित व्यक्तीला आयकरातून सुट मिळणार आहे.

तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी तब्बल साडेसहा लाखांपेक्षा अधिक मदत केली आहे. सेवानिवृत्तांनीही मदतीचा हात देताना एक लाख रूपयांची मदत दिली. विदेशातून अनेक तरूण थेट खात्यावर रक्कम पाठवित आहेत.

या कोव्हीड सेंटरमध्ये पारनेर, नगर मतदारसंघाबरोबरच जिल्हयातील विविध तालुक्यातील रूग्ण दाखल होत आहेत. रूग्ण दाखल करताना कोणताही भेदभाव केला जात नाही.

प्रत्येकाची वैयक्तिक काळजी घेतली जाते. मागील वर्षातही लंके यांनी कर्जुले हर्या येथे सुरू केलेल्या शरदचंद्र पवार आरोग्य मंदिरामध्येही साडेचार हजार रूग्णांवर मोफत उपचार करण्यात आले होते.

साखर कारखानदारांचा जिल्हा म्हणून नगर जिल्ह्याची ओळख आहे. कोरोनाच्या महामारीचे मोठे संकट उभे राहिलेले असताना सहकारी साखर कारखानदारांनी कोविड सेंटर सुरू करण्यासाठी पुढाकार घेतलेला नाही. मात्र, आमदार लंके यांनी लोकसहभागातून उभारलेले बहुदा देशातील पहिले भव्य कोविड सेंटर असावे.

मदतीला परदेशातूनही धावले

इंग्लंडमधील रहाणारे प्रसन्नकुमार व सुनीलकुमार या भारतीय वंशाच्या नागरिकांनीही प्रत्येकी १०० पौंडची (प्रत्येकी १० हजार ५००) मदत प्रतिष्ठानच्या खात्यावर वर्ग केली आहे. जगन्नाथाचा रथ ओढण्यासाठी त्यांनीही परदेशातून हातभार लावला आहे.

बातमीदार - मार्तंड बुचुडे