हिवरेबाजारला लागला सीताफळांचा गोडवा

दत्ता इंगळे
Sunday, 22 November 2020

राज्य आदर्श गाव प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी 2015 मध्ये आपल्या शेतात पाच एकरांवर, नवनाथ कसपटे यांनी संशोधित केलेल्या सीताफळाच्या एनएमके गोल्डन जातीच्या 160 झाडांची लागवड केली.

अहमदनगर : देशभरात हिवरेबाजारचा आदर्श गाव म्हणून लौकिक आहे. मात्र, आता हे गाव एका नव्या ओळखीसह समोर येत आहे. ही ओळख सीताफळांच्या उत्पादनाद्वारे होत आहे. कमी पाण्यात येणाऱ्या या पिकाचा गावकऱ्यांना गोडवा लागला आहे. 

राज्य आदर्श गाव प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी 2015 मध्ये आपल्या शेतात पाच एकरांवर, नवनाथ कसपटे यांनी संशोधित केलेल्या सीताफळाच्या एनएमके गोल्डन जातीच्या 160 झाडांची लागवड केली. गेल्या वर्षापासून पीक हाती येण्यास सुरवात झाली. यावर्षी पाच एकरांतून साधारणपणे 20 ते 25 टन सीताफळे निघण्याचा अंदाज आहे. शिवाय, पवार यांनी या वर्षी पुन्हा अडीच एकरांवर एकरी 300 प्रमाणे ७०० झाडांची लागवड केली. 

अहमदनगरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

पवार यांनी पुण्यातील गुलटेकडी व मुंबईतील वाशीच्या बाजारात सीताफळांची विक्री केली. त्यांना सरासरी 80 ते 120 रुपये किलो दर मिळाला. आतापर्यंत त्यांनी सहा टन सीताफळांची विक्री केली आहे. दर आठ दिवसांनी तोडणी केली जाते. पवार यांनी सीताफळ बागेला 80 टक्के सेंद्रिय व 20 टक्के अन्य खते वापरली. सेंद्रिय खतांमध्ये शेणखत, स्लरीसह ठिबकमधून विरघळणारी सेंद्रिय खते दिली जातात. गोमूत्राच्या साधारण तीन फवारण्या केल्या. सेंद्रिय खत व गोमूत्राच्या वापरामुळे रोगांपासून बचाव झाला. सेंद्रिय खतांमुळे गोडवा व रसाळपणा वाढल्याचे बागेचे व्यवस्थापन पाहणारे आशिष गोपीनाथ पवार यांनी सांगितले. 

सीताफळाच्या बागेत आंतरपीक 

सीताफळ लागवड केल्यानंतर साधारण चार वर्षे हरभरा, कांदा व मुगाचे पाच एकरांवर आंतरपीक घेतले. कांदाउत्पादनातून दर वर्षी साधारणपणे दोन लाख रुपये, हरभरा उत्पादनातून एक लाख व मूग उत्पादनातून 25 हजार रुपये उत्पन्न मिळाले. गेल्या तीन वर्षांपासून ते सीताफळाची रोपे तयार करतात. यावर्षी साधारण पाच हजार रोपे त्यांनी तयार केली आहेत. 

प्रक्रिया उद्योगाचे नियोजन
 
गेल्या दोन वर्षांपासून अन्य भागातही सीताफळ लागवड वाढली. कोणत्याही पिकाचे उत्पादन वाढले, तर मागणी कमी होते. त्याच दरावर परिणाम होतो. ही बाब लक्षात घेऊन हिवरेबाजार येथेच सीताफळावर प्रक्रिया उद्योग उभारण्याचे नियोजन सुरू आहे. 

महाराष्ट्र आदर्श गाव प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार म्हणाले, आमच्या भागात पावसाचे प्रमाण कमी असल्याने, पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करतो. दरवर्षी पाण्याचा ताळेबंद मांडूनच पुढील नियोजन केले जाते. अलीकडे आमच्या शिवारात फळपिकांची लागवड वाढली. त्यात सीताफळांचे क्षेत्र सर्वाधिक आहे. आता अनेक शेतकरी सीताफळ लागवडीकडे वळले आहेत. कमी पाण्यात येणारे आणि शेतकऱ्यांना आर्थिक फायदा देणारे पीक म्हणून सीताफळाकडे पाहिले जाते. केवळ पीकच घ्यायचे नाही, तर त्यावर प्रक्रिया उद्योग सुरू करण्याचाही शेतकऱ्यांनी विचार करावा. 

संपादन - सुस्मिता वडतिले

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hivrebazar is known for its custard apple production