esakal | हनी ट्रॅप ः वो बुलाती है.. मगर जाने का नही... नगरच्या "ज्योती'चा पुण्या-मुंबईतही जलवा! 
sakal

बोलून बातमी शोधा

Honey Trap - Ahmednagar woman cheats people in Pune

"बकरा' मिळाला, की त्याला कसे जाळ्यात ओढायचे व "व्यवहार' कितीपर्यंत ताणायचा, याचा निर्णय मात्र "राजा' घेतो. नगर-जामखेड रस्त्यावरील विविध ढाब्यांवर रात्री अकराच्या पुढे बैठका घेतल्या जातात. स्नेहसंमेलन, वाढदिवस, छोटेखानी बैठका, भिशी पार्टी अशी गोंडस नावे देत या बैठका होतात. 

हनी ट्रॅप ः वो बुलाती है.. मगर जाने का नही... नगरच्या "ज्योती'चा पुण्या-मुंबईतही जलवा! 

sakal_logo
By
डॉ. बाळ ज. बोठे पाटील

नगर ः विविध क्षेत्रांतील "वजनदार' व धनिकांना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून ब्लॅकमेलिंग करणाऱ्या "हनी ट्रॅप'ची नगरमध्ये लावलेली "ज्योत' चांगलीच "तेवत' आहे. मात्र, तिच्या विखारी तेजामुळे अनेकांचे कौटुंबिक वातावरण काळवंडत आहे.

नगर जिल्हा पादाक्रांत केल्यानंतर या "ज्योती'ने आपले "अनोखे' "रूप' दाखवत औरंगाबाद, नाशिक, सोलापूरसह आसपासच्या जिल्ह्यांतील "बाजारपेठ'ही काबीज केली. आता तर "ज्योती'चा जलवा थेट पुण्या-मुंबईपर्यंत पोचला आहे.

विशेष म्हणजे मंत्रालयाच्या केवळ दारात न स्थिरावता तेथील काही मजले "ज्योती'ने आपल्या कवेत घेतले आहेत. झटपट श्रीमंत होऊन ऐषारामात जीवन जगण्यासाठी, कोणत्याही थराला जात समाजविघातक कृत्य करणाऱ्या टोळ्यांच्या उद्योगापायी सहकाराचा व पुरोगामी विचारांचा वारसा लाभलेल्या नगर जिल्ह्याची मात्र राज्यभर पुरती बदनामी होत आहे. 

"हनी ट्रॅप'च्या माध्यमातून नगर जिल्ह्यातील विविध टोळ्या लुटमार करीत असल्याचे वृत्त "सकाळ'ने बुधवारी (ता. 6) प्रसिद्ध केले. त्याचा राज्यभर गवगवा झाला. सरकारनामा व ई-सकाळच्या माध्यमातून हे वृत्त जगभर पसरले.

सोशल मीडियावरही ते जगभर व्हायरल झाले. "सकाळ'चे कौतुक करीत, अशा टोळ्यांवर कठोर कारवाईची आग्रही मागणी राज्याबरोबरच परदेशांतूनही झाली. या टोळ्यांच्या "पीडितां'कडूनही "सकाळ'ला माहिती देण्यात आली. जात्यात भरडून गेलेल्यांबरोबरच सध्या "सुपा'त असलेल्यांनीही "सकाळ'कडे मदतीची विनंती केली.

काही "माहीतगार'ही धक्कादायक माहिती व पुरावे देण्यासाठी सरसावले. त्यातूनच नगर-जामखेड रस्त्यावरील एका मोठ्या गावातील या टोळीच्या मास्टरमाइंडचा छडा लागला आहे. आतापर्यंत "हनी ट्रॅप' व ब्लॅकमेलिंग करण्यात कुप्रसिद्ध असलेल्या व स्वतःला एका "ब्रिगेड'चा स्वयंघोषित बॉस समजत असलेल्या या मास्टमाइंड "राजा'च्या माध्यमातून अनेकांचे "पर' मात्र "काळे' झाले आहेत. तरीही त्याची समाजविघातक कृत्ये सुरूच आहेत.

टोळीतील उत्पन्नात निम्मा वाटा घेऊनही स्वतः "सेफ' राहत इतरांना मात्र तो नेहमी संकटात टाकतो. "जिस थाली में खाएगा, उसी थाली में छेद करेगा' अशी त्याची ख्याती आहे. या "राजा'च्या फक्त तोंडातच बळ असून, संघर्ष व हाणामारीची वेळ येताच, तोंडातील गुटखा गिळत पलायन करण्याची त्याची "खासियत' आहे! 

मध्यरात्री ढाब्यावरच होते "हनी ट्रॅप'चे प्लॅनिंग 
टोळीच्या या म्होरक्‍यांपैकी एकाने "भिंगार'चे "दिवे' पाजळत "सागर'तळ ढवळला. या म्होरक्‍याचेही अनेक उद्योग आहेत. हनी ट्रॅपसाठी "बकरा' शोधणे, त्यांच्या "कार्यक्रमा'ची वेळ व ठिकाण ठरविणे, बकरा पटविण्यासाठी संबंधित महिलांना अश्‍लील व्हिडिओ उपलब्ध करून देणे, संभाषणाच्या "ट्रिक' सांगणे आदी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या "सागर'तळ ढवळत पार पाडल्या जातात.

"बकरा' मिळाला, की त्याला कसे जाळ्यात ओढायचे व "व्यवहार' कितीपर्यंत ताणायचा, याचा निर्णय मात्र "राजा' घेतो. नगर-जामखेड रस्त्यावरील विविध ढाब्यांवर रात्री अकराच्या पुढे बैठका घेतल्या जातात. स्नेहसंमेलन, वाढदिवस, छोटेखानी बैठका, भिशी पार्टी अशी गोंडस नावे देत या बैठका होतात. "राजा'च्या कथित आधिपत्याखालील हा रस्ता "सेफ' वाटत असल्याने, या रस्त्यावरील ढाब्यांवर बैठका होत असल्याचे सांगण्यात येते.

विशेष म्हणजे काही "मोजक्‍या' महिलांच्या उपस्थितीत होत असलेल्या या बैठका रात्री अकराला सुरू होऊन पहाटे दीड-दोनपर्यंत चालतात. बैठकीतील चर्चा व "एकांतवास'ही काही सहभागी महिलांना चांगलाच "भावतो' असे बोलले जाते. 

गेल्या 23 फेब्रुवारी 2020 रोजी रात्री अकरा ते पहाटे दोनपर्यंत नगर-जामखेड रस्त्यावरील एका ढाब्यावर "शंभू राजांची' महती सांगत वाढदिवसाच्या नावाखाली बैठक रंगली होती. या "साग्रसंगीत' बैठकीला काही "प्लॅनिंग मास्टर' महिलांचीही उपस्थिती होती. त्यात संभाव्य "बकरा' असलेले व्यापारी, अधिकारी, राजकारणी आणि काही बेडर व निर्भीड पत्रकारांना गुंतविण्याची व्यूहरचना निश्‍चित करण्यात आल्याची माहिती आहे. टोळीतील काही "मोजक्‍या' मंडळींचे कॉल डिटेल्स व लोकेशन काढले, तर त्यातून या भयानक बाबी स्पष्ट होतील. 

जाणून घ्या - या गावचा कांदा निघालाय लंडनला
 
"मामी'चे भारी "कवित्व' राज्यभर गाजले खरे, 
त्यातून निर्माण झाले "ज्योती'-"सोना'चे "झरे' 
हनी ट्रॅप करणाऱ्या टोळीच्या केंद्रस्थानी असलेल्या "मामी'चे "कवित्व' तर महाभयंकर आहे. "रंग गेला तरी पैसे परत' अन्‌ अंगावर अर्धा किलो सोने, अशी या "मामी'ची ओळखीची खूण. मामीची अदा पाहूनच "बकरे' सहजपणे "घायाळ' होतात हे विशेष! मामीचा "एकनाथां'च्या नगरात आलिशान बंगला आहे.

मामीकडे पहिलीच अर्ध्या कोटीची आलिशान गाडी आहे. त्यात अलीकडेच पाऊण कोटीच्या दुसऱ्या गाडीची भर पडली. मामीचा आलिशान बंगला व महागड्या गाड्या टोळीच्या दोन्ही म्होरक्‍यांनी काही "खास' महिलांना दाखविल्या. थोडेसे "ऍडजेस्ट' केले, तर काही दिवसांतच तुम्ही "मामी' सारख्याच "धनवान' होऊ शकता, असे त्यांच्या मनावर बिंबविण्यात आले. या "खास' महिलांना राहण्याच्या व बोलण्याच्या "टिप्स' दिल्या गेल्या.

त्यांच्या सौंदर्यवृद्धीसाठी टोळीच्या एकत्रित उत्पनातून "खास निधी' खर्च करण्यात आल्याची वदंता आहे. त्यातूनच नव्या इनिंगची "ज्योत' पेटली. "सोना'चे "झरे' निर्माण झाले. "सोना'च्या मोहजालात "भापकर सर'ही फसले. "जालन्या'च्या काळी जादू करणाऱ्या "गणेश'ला साकडे घालीत "गंडादोरी'चा प्रयोगही करण्यात आला. "गजराजा'वर स्वार होत "आनंद'वारी करण्याचा मूर्खपणा काहींनी केला. ही "आनंदवारी' त्यांच्या लौकिकाला कुठे घेऊन जाईल, हे आता काळच सांगेल. 

काहींनी पोलिस अधिकाऱ्यांच्या मदतीने नगरच्या चितळे रस्त्यावरील मोबाईलविक्रेता "गंडवला'. काहींनी आपल्या घरात "देव्हारा' ठेवत स्वतःचा असली चेहरा लपविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यातच नगर "शहरा'तील एका सहकारी बॅंकेचा संचालक व नामवंत देवस्थानाचा विश्‍वस्त असलेला "अशोक'ही सध्या चर्चेत आहे. टोळी त्यालाच आपला "कानडा' विठ्ठलू समजत आहे.

"कानडा'च्या कार्यालयातच ट्रॅपनंतरच्या पुढील "सेटिंग' होत असल्याचे पुढे येत आहे. नगरच्या सराफ बाजारातील "मुके' माणूस सावज शोधून मामी व टोळीच्या ताब्यात देण्याची महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे "मुके' माणूस आता टोळीचा ईश म्हणजे "देव' झाला आहे. परिणामी "आळीकर' मंडळी त्याच्यावर भलतीच खूष नसतील तरच नवल! 
 
राज्यभर जाळे व कोटींच्या घरात उत्पन्न 
टोळीतील काही मंडळी हनी ट्रॅपबरोबरच माहिती अधिकार अर्जांद्वारे ब्लॅकमेलिंग, गांजासह इतर अमली पदार्थांची विक्री, अशी "मल्टिपल' कामेही करीत असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. टोळीतील महिलांनाही या पदार्थांसह पेय सेवन करण्याचीही सवय लागली आहे.

काही तालुक्‍यांची ठिकाणे व मोजक्‍या मोठ्या गावांमध्येही अशा प्रकारच्या "मल्टिपल वर्क' करणाऱ्या टोळ्या कार्यरत आहेत. नगरच्या टोळीचे मासिक उत्पन्न काही कोटींच्या घरात असल्याचे समजते. जिल्ह्यातील इतर टोळ्यांनाही काही ठिकाणी, विशेषतः उत्तर जिल्ह्यात पोलिसांकडूनच "अभय' मिळत असल्याची माहिती आहे. 

...अन्‌ "ज्योती'ला गावला इवलासा "सोनू' 
केडगावच्या भरवस्तीतील "सोनू' काही दिवसांपूर्वीच "ज्योती'ला गावला. "भानुदासा'च्या कट्टर समर्थक घराण्यातील "सोनू' केडगाव भागात भलताच लोकप्रिय आहे. मात्र, काहीही "गावले' तरी "ज्योती'ला पावले

"येवले' या बहुचर्चित म्हणीची प्रचिती आली. फक्त दोन चुंबन "सोनू'ला तेरा लाखांना पडले. दुसऱ्या घटनेत "राजा'च्या नेतृत्वाखाली नगरमधील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या डॉक्‍टरला "खास' महिलेमार्फत बाटलीत उतरविण्याचे काम जोमात सुरू होते; परंतु "सकाळ'च्या "हनी ट्रॅप'च्या बातमीने मोठी खळबळ उडाल्याने हे काम आता "अधोरे' राहिले आहे. त्यामुळे हा "योग' श्रीगोंदेकरांच्या पथ्यावर पडला. "हनी ट्रॅप'च्या "सकाळ'मधील बातमीचे सोशल मीडियावरही कौतुक झाले. कित्येकांनी "वो बुलाती हैं, मगर जाने का नहीं' हे गाणे "सकाळ'च्या बातमीसह आपल्या "स्टेटस' व वॉलवर ठेवले. त्याचीही चांगलीच चर्चा झडली. 

"सकाळ'मधील अधिकारी-कर्मचारी टोळीच्या रडारवर! 
"हनी ट्रॅप'चा पर्दाफाश केल्याने केवळ नगरच्याच नव्हे, तर जिल्ह्यातील टोळ्या नेस्तनाबूत करण्यासाठी "यंत्रणा' सतर्क झाली आहे. टोळीला "आतून' साह्य करीत पैसे लाटणाऱ्या "गद्दारां'चीही माहिती हाती येत आहे.

टोळीतील "महत्त्वाचे' पुरुष व महिलांच्या मोबाईलवर माध्यमांचीही नजर आहे. त्यामुळे टोळ्याही सतर्क झाल्या आहेत. टोळीतील काही स्वयंघोषित "हुशार' अन्‌ "जनसंपर्क' असलेल्या महिला, तसेच सतत फक्त "बडबडगीते' म्हणण्यात पटाईत पुरुषांना मात्र "सकाळ'ची ही शोधपत्रकारिता अडचणीची ठरत आहे. त्यामुळे बदला घेण्यासाठी "हनी ट्रॅप'ची माहिती मिळविण्यात अग्रभागी असलेल्या "सकाळ'मधील अधिकारी, कर्मचारी अथवा त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध टोळीतील सदस्य अथवा समर्थक असलेल्या राजकीय, सामाजिक अथवा इतर क्षेत्रांतील महिलांना किंवा भाडोत्री महिलांना पुढे करून विनयभंग, बलात्काराचे गुन्हे नोंदविण्याची व्यर्थ धडपड टोळीने चालविल्याचे समजते.

हे नाही जमले तरी किमान म्होरक्‍या अथवा त्याच्या समर्थकांमार्फत "ऍट्रॉसिटी'चा गुन्हा अथवा अपघात घडवून आणण्याचा पर्याय निवडायचा, असेही घाटत आहे. उत्तर नगर जिल्ह्यातील एका कुप्रसिद्ध टोळीचा म्होरक्‍या असलेल्या स्वयंघोषित कायदेपंडिताचे "मार्गदर्शन' घेऊन कोणत्याही परिस्थितीत "विजय' मिळवायचाच, असा चंग या टोळीने बांधल्याचे सांगण्यात येते. त्यासाठी त्यांना मुंबई-पुण्यातून रसदही मिळू शकते.

हेही वाचा - हनी ट्रॅपमध्ये पोलिस, व्यापारी, धनिकही 

गरज पडल्यास मुंबईतील "डॅडी' अथवा "मम्मी'चीही मदत घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या पार्श्‍वभूमीवर "सकाळ'नेही संबंधित संशयितांचे "उद्योग', चारित्र्य व इतर बाबींची सखोल माहिती राज्यपातळीवरील यंत्रणेला दिलेली आहे. साहजिकच, "सकाळ'च्या कोणाही अधिकारी, कर्मचारी अथवा त्यांच्या कुटुंबीयांना कोणत्याही प्रकारचा दगाफटका झाल्यास, त्याची जबाबदारी टोळीतील संबंधितांवरच निश्‍चित होईल, यात शंका नाही. 
 

loading image