या गावांचा कांदा निघालाय लंडनला... 

सनी सोनावळे : सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 7 May 2020

शेतकऱ्यांच्या सोयीसाठी उद्योजक किरण डेरे व विकास गांधी यांनी खासगी कांदा मार्केट सुरू केले. गेल्या पाच वर्षांपासून मार्केटच्या माध्यमातून ते शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देत आहेत. 

टाकळी ढोकेश्वर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाउन असल्याने आणि बाहेरील व्यापारी कांदा घेत नसल्याने, शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली होती. मात्र, यावर प्रसन्ना कृषी उद्योगसमूहाने पुढाकार घेत, शेतकऱ्यांचा कांदा जास्त भावाने खरेदी करून समुद्रमार्गे थेट लंडनला पाठविण्याचे काम सुरू केले आहे. 

शेतकऱ्यांच्या सोयीसाठी उद्योजक किरण डेरे व विकास गांधी यांनी खासगी कांदा मार्केट सुरू केले. गेल्या पाच वर्षांपासून मार्केटच्या माध्यमातून ते शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देत आहेत. 

कोरोनामुळे सध्या बाहेर ग्राहक उपलब्ध होत नाहीत आणि दक्षिणेतील काही राज्यांमध्ये कांदा उतरवून घेतला जात नाही. यामुळे व्यापाऱ्यांना कांदा घेणे परवडत नसल्याने, बाजार समितीत शेतकरी कांदा घेऊन जात नाहीत. या स्थितीत कांद्याचे करायचे काय, हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावतो.

मात्र, डेरे यांनी यावर उपाय शोधत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कांदा खरेदी केला. शिवाय, इतरांपेक्षा किलोला दोन ते तीन रुपये जास्त भाव दिला.

शेतावर हा कांदा खरेदी करताना शेतकऱ्यांकडून गोणी, मजुरी, तोलाई, मापाई, हमालीचे पैसे घेतले जात नाहीत. रांधे, दरोडी, कळस, पाडळी आळे, गारखिंडी, अळकुटी परिसरातील गावांमधून कांदा खरेदी करण्यात येतो. कंटेनरमध्ये 25 टन कांदा मजुरांमार्फत भरला जातो. मुंबईत गेल्यानंतर जहाजामधून हा कांदा लंडनकडे रवाना करण्यात येतो. 
... 

बांधावर जाऊन कांदा खरेदी केल्याने, तसेच जास्त भाव दिल्याने शेतकरी समाधानी आहेत. कांद्याचा कंटेनर पोचायला सत्तावीस दिवस लागतात. दर आठ दिवसांनी 25 टन कांदा येथून भरण्यात येतो. कांद्याचे अडीच किलोचे पॅकेट तयार करून पाठविले जातात. 
- किरण डेरे, संचालक, प्रसन्ना कृषी उद्योगसमूह 
.... 
आम्ही पाच वर्षांपासून प्रसन्ना कृषी उद्योगसमूहामधून शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य भाव देत आहोत. आताही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कांदा शेताच्या बांधावर जाऊन खरेदी करत आहोत व योग्य भावदेखील देत आहोत. 
- सुभाष गलांडे, शेतकरी, कळस 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parner's onion went to London

Tags
टॉपिकस
Topic Tags: