esakal | Sharad Pawar : "हायड्रोजन गॅस हे पुढचे व्हर्जन"
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar : "हायड्रोजन गॅस हे पुढचे व्हर्जन"

Sharad Pawar : "हायड्रोजन गॅस हे पुढचे व्हर्जन"

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : ‘‘सध्या राज्यभर अतिवृष्टी सुरू आहे. त्यात हजारो एकर पिके नष्ट होत आहेत. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे; परंतु भूगर्भात पाणीपातळी वाढत आहे. आगामी दोन वर्षे पुरेल इतका पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे आगामी काळात शेतकरी ऊसपीक घेण्याकडे वळतील. हे पाहता, कारखान्यांनी केवळ साखरनिर्मिती न करता इथेनॉलकडे वळले पाहिजे. साखरकारखानदारीपुढे सध्या मोठे आव्हान आहे. इथेनॉलची निर्मिती करून हायड्रोजन निर्मितीकडेही पहावे. कारण, हायड्रोजन गॅस हा इथेनॉलचे पुढचे व्हर्जन आहे. भविष्यात त्याची गरज वाढणार आहे. गडकरींनी केंद्राचे धोरण इथेनॉलसाठी चांगले राहील याची काळजी घ्यावी,’’ अशी अपेक्षा ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली.

पवार म्हणाले, ‘‘आमदार रोहित पवार गडकरींना रस्त्यांच्या कामांबाबत भेटले त्या वेळी, ‘शरद पवार कार्यक्रमास आले, तर मी मंजुरी देईन,’ अशी अट त्यांनी घातली होती. एखाद्या कार्यक्रमाला गेलो, तर पुढे त्याचे काय होते, ते कळत नाही. मात्र, गडकरींनी हाती घेतलेले काम लगेच पूर्ण होते. त्यामुळे मी या कार्यक्रमाला आलो. जगात कुठल्याही देशाचे अर्थकारण तेथील दळणवळणावर बरेच अवलंबून असते. हवाई, जलवाहतुकीपेक्षा रस्तेवाहतुकीला महत्त्व आहे. कारण, सर्वसामान्यांचा प्रवास जलदगतीने याच मार्गाने होतो. त्याला गती देण्याचे काम होत आहे, ही आनंदाची बाब आहे.’’

गडकरी यांच्यावर पवारांकडून स्तुतिसुमने

कामे घेऊन गेलेल्यांना गडकरी त्यांची समाजाप्रती असलेली तळमळ पाहतात. कामे मंजूर करताना पक्ष पाहत नाहीत. ते उद्‌घाटन करतात, ती कामे नंतर लगेचच पूर्ण होतात. मी वाहनाने प्रवास करण्याला प्राधान्य देतो. रस्त्याने जाताना लोकप्रतिनीधींशी चांगल्या रस्त्याविषयी चर्चा केली, तर ‘ही गडकरी यांची कृपा’ असे सांगितले जाते, अशी स्तुतिसुमने आज गडकरी यांच्यावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उधळली. साखर कारखानदारीविषयी चिंता व्यक्त करीत पवार यांनी आगामी काळात साखर निर्मितीवर थांबून चालणार नाही, तर कारखान्यांनी इतर पर्याय निवडावेत. शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर देण्यासाठी इथेनॉलबरोबरच इतर उत्पादनांचाही विचार करावा, असे आवाहन त्यांनी कारखान्यांना केले.

दोन्ही नेत्यांनी राजकीय भाष्य टाळले

भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार एकाच व्यासपीठावर आले. कार्यक्रमादरम्यान दोघांनीही भाषणातून राजकीय भाष्य टाळले. महाष्ट्रात राष्ट्रवादी सत्तेत तर भाजप विरोधी पक्ष आहे. असे असताना दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या पक्षांविषयी टीकाचा शब्दही उचारला नाही, हे विशेष. उलट जिल्ह्याच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगून एकप्रकारे विकासकामांबाबत एकतेचा संदेश दिला.

loading image
go to top