मी पुण्याचा पीआय बोलतोय, माझ्या मुलाला सोडा...श्रीगोंदा पोलिस म्हणाले, जमणार नाही

संजय आ. काटे
सोमवार, 13 जुलै 2020

मी पीआय... बोलतोय, आपण पडकलेला माझा मुलगा आहे, त्याला सोडून द्या

श्रीगोंदे : पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील एका पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षकाचा मुलगा श्रीगोंद्यात मोटारसायकलवरुन आला आणि पोलिसांच्या गस्तीत पकडला गेला.

त्याने आपल्या स्टाईलमध्ये सांगितलं, माझे वडील पोलिस निरीक्षक आहेत. मला जावू द्या. कारवाईत दंग असणारे पोलिस त्याकडे दुर्लक्ष करीत होते. काही वेळातच त्या मुलाच्या वडिलांचा श्रीगोंद्याचे पोलिस निरीक्षक दौलत जाधव यांना मोबाईल आला. मी पीआय बोलतोय, आपण पडकलेला माझा मुलगा आहे, त्याला सोडून द्या, असे सांगताच जाधव यांनी, 'साहेब आम्हाला अजून खोलात जाण्याची वेळ आणू नका, परवाना तपासावा लागेल' असे म्हणताच तिकडून फोन कट झाला.

हेही वाचा - नगरमध्ये कोरोनाचा दुपारचा आकडा तेवीस

मुलानेही काही एक वाद न करता दंड भरला. आणि तेथून काढता पाय घेतला. श्रीगोंद्यात कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने आज प्रशासनाने कडक धोरण घेतले. तहसीलदार महेंद्र माळी, पोलिस निरीक्षक जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. नितीन खामकर, मुख्याधिकारी शरद देवरे यांनी शहरात गस्त घालून शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी काही दुचाकी अडविल्या. दुचाकीवर असणाऱ्या तिघांकडून पालिकेने दंड वसुल केलाच, शिवाय पोलिसांनीही दंड ठोठावला.

त्यातील एका दुचाकीवर असणाऱ्या व्यक्तीने तो पोलिस निरीक्षकांचा मुलगा असल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांनी त्याचे ऐकले नाही. दंड भरा आणि जा असे सांगितले. पोलिस ऐकत नसल्याचे पाहून त्याने त्याच्या वडिलांना फोन केला. वडील असणाऱ्या त्या पोलिस निरीक्षकांचा जाधव यांना फोन आला.

जाधव यांनी त्यांना सांगितले की, संयुक्त कारवाई असून पत्रकार सोबत आहेत. दंड भरायला सांगा, अजून खोलात गेलो तर पुन्हा परवाना तपासावा लागेल, असे सांगताच समोर असणाऱ्या त्या मुलाने दंड भरला आणि तेथून पळ काढला.

 

सहकारी पोलिस निरीक्षकांचा फोन आला होता. मात्र त्यांचा मुलगा चुकला दंड वसुल केला. तो पुणे जिल्ह्यातून येथे आला होता. कारवाईची गर्दी असल्याने केवळ दंड वसुल केला. 
- दौलत जाधव, पोलिस निरीक्षक श्रीगोंदे. 

 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I am talking about PI, leave my son Shrigonda police said, it will not work