
नवी दिल्ली येथे काही दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा आहे.
राळेगणसिद्धी (अहमदनगर) : नवी दिल्ली येथे काही दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा आहे. तीन वर्षांपासून शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मी संघर्ष करीत आहे. दोन वेळा दिलेले लेखी आश्वासन केंद्र सरकार पाळत नाही.
याला काय सरकार म्हणावे, असा सवाल करीत केंद्र सरकारला पत्र लिहले. दिल्लीत आंदोलनासाठी रामलीला किंवा जंतरमंतर मैदानावर जागा मिळाली तर शेतकऱ्यांसाठी शेवटचे आंदोलन करणार असल्याची माहिती ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी दिली.
दिल्लीतील शेतकरी आंदोलनात हजारे यांनी सहभागी व्हावे. यासाठी पंकज प्रकाश श्रीवास्तव (बिहार), मोहित शर्मा (दिल्ली), राजरतन शिंदे, प्रदिप मेटी, किरणकुमार वर्मा, सतिशकुमार राज पुरोहित (कर्नाटक) या सहा शेतक-यांच्या शिष्टमंडळाने आज (ता. २०) राळेगणसिद्धी येथे त्यांची भेट घेत सुमारे एक तास चर्चा केली. यावेळी हजारे बोलत होते.
नगर जिल्ह्यातील बातम्या वाचणासाठी येथे क्लिक करा
शेतक-यांच्या शिष्टमंडळाने राळेगणसिद्धीत प्रवेश केल्यानंतर लगेच थाळी वाजवत आंदोलन करण्यास सुरुवात केली. मात्र हजारे यांच्या कार्यालयाकडून अण्णा आपणाला भेटणार असल्याचे सांगितल्यावर ते भेटीसाठी गेले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्य प्रवेशद्वारावर वैद्यकीय पथकाने तपासणी केल्यानंतरच त्यांना हजारे यांच्या भेटीला सोडण्यात आले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता पोलिसाकडून मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला होता.
दिल्ली येथे केंद्र सरकार आंदोलनकर्त्या शेतक-यांना विविध प्रकारे त्रास देत आहे. या आंदोलनात २२ शेतकरी आतापर्यंत शहिद झाले आहेत. हजारे यांनी दिल्लीतील शेतक-यांच्या आंदोलनात सहभाग घेतला तर आंदोलनाची ताकत निश्चितच वाढेल. आपल्याकडे संपूर्ण देश दुसरे गांधी म्हणून पाहत आहेत व तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहेत. अशा भावना शेतक-यांच्या शिष्टमंडळाने व्यक्त केल्या.
या वेळी हजारे म्हणाले, माझा केंद्र सरकारबरोबर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संघर्ष सुरूच आहे. स्वामिनाथ आयोगाच्या शिफारशीनुसार शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारीत हमीभाव (C2 + 50) मिळावा. निवडणूक आयोगाप्रमाणे कृषीमुल्य आयोगाची स्थापना करावी यासह इतर मागण्यांसाठी गेल्या तीन वर्षांपासून आपला लढा सुरू आहे.
केंद्र सरकारला अनेकदा पत्रव्यवहारही केला आहे. शेतक-यांच्या प्रश्नांवर २३ मार्च २०१८ ला दिल्लीत उपोषण सुरू केले होते. त्यावेळी पंतपधान नरेंद्र मोदी यांनी लेखी आश्वासन दिले होते. त्यानंतर ३० जानेवारी २०१९ ला राळेगण सिद्धीत उपोषण सुरू केले होते. केंद्रीय कृषीमंत्री राधा मोहन सिंग व तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी आश्वासन दिले होते.
परंतु, केंद्र सरकार दिलेले आश्वासन पाळत नाही. देशातील सर्व जेल ज्यावेळी भरून जातील त्यावेळी खऱ्या अर्थाने सरकारला जाग येईल. त्यासाठी देशातील शेतक-यांसह सर्व जनतेने रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. सरकार कोणत्या गोष्टीला घाबरत असेल तर त्यांनी सर्वात जास्त भीती ही पडण्याची असते. त्यामुळे दिल्लीतील शेतकरी आंदोलनात देशातील सर्व शेतकऱ्यांनी सहभागी झाले पाहिजे, असे हजारे म्हणाले.
यावेळी माजी उपसरपंच लाभेष औटी, सुरेश पठारे, दादा पठारे, संजय पठाडे, गणेश भोसले, शाम पठाडे, अमोल झेंडे, अन्सार शेख, राजाराम गाजरे, सुनिल जाधव, शांताराम जाधव उपस्थित होते.
संपादन : अशोक मुरुमकर