पाल्याचे आधार कार्ड अपडेट केलंय का, नसल्यास मुकावे लागेल अनेक लाभांना

गौरव साळुंके
Thursday, 21 January 2021

पहिली ते 12 वीच्या विद्यार्थ्यांचे आधार नोंदणीसह अपडेट करून विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक सरल प्रणालीत नोंदविण्याचा आदेश शालेय शिक्षण विभागाने काढला.

श्रीरामपूर ः शालेय प्रवेशासह विविध शैक्षणिक सुविधांच्या लाभासाठी विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड असणे आवश्‍यक आहे. या संदर्भात शालेय शिक्षण विभागाने पालकांसाठी अनेकदा सूचना केल्या. परंतु अद्याप शेकडो विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची सरल प्रणालीत नोंद झालेली नसल्याने आता थेट शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांची आधार नोंदणी आणि आधार अपडेट केले जाणार आहे. 

पहिली ते 12 वीच्या विद्यार्थ्यांचे आधार नोंदणीसह अपडेट करून विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक सरल प्रणालीत नोंदविण्याचा आदेश शालेय शिक्षण विभागाने काढला.

या संदर्भात राज्य शालेय शिक्षण विभागाने स्थानिक शिक्षण विभागासाठी नुकत्याच सूचना जारी केल्या. तालुक्‍यातील सर्व विद्यार्थ्यांचे आधार नोंदणीसह अपडेटसाठी दोन शालेय केंद्रावर आधार नोंदणी संच उपलब्ध केले आहेत.

हेही वाचा - मेरे पास मेरा बाप है, गडाखांचा डायलॉग हीट

या आधार नोंदणी संचाद्वारे विद्यार्थ्यांची आधार कार्ड नोंदणी आणि अपडेट करण्यासाठी त्रयस्थ सेवा संस्थेमार्फत दोन आधार ऑपरेटरची नेमणूक केली आहे. प्रत्येक तालुक्‍यासाठी दोन ऑपरेटरमार्फत 31 जानेवारीपर्यंत ही सुविधा लागू केली आहे. 

या पूर्वी पंचायत समिती स्तरावरील आधार ऑपरेटरद्वारे विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीचे कामकाज रखडल्यामुळे आता थेट शिक्षण विभागाकडून नियोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांकडील आधार क्रमांकाची माहिती विद्यार्थी पोर्टलवर शालेय लॉगिनवरून अपडेट केली जाणार आहे. त्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याने दोन ठिकाणी शालेय प्रवेश असल्याचे समोर येणार आहे.

विविध शैक्षणिक सुविधांसाठी ऑनलाइन विद्यार्थी नोंदणी फायदेशीर ठरेल. त्यामुळे आधार नोंदणीकृत विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक संबंधित पालकांनी शालेय विभागाकडे तातडीने जमा करण्याचे आवाहन शिक्षण विभागातर्फे केले आहे. अहमदनगर

 

तालुक्‍यातील 11 हजार 458 विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड नोंदणीसह अपडेट केले जाणार आहे. त्यासाठी शिक्षण विभागाकडे दोन आधार नोंदणी संच उपलब्ध आहेत. ऑपरेटर रुजू झाल्यानंतर तातडीने कार्यवाही केली जाईल. पालकांकडून प्रतिसाद न मिळाल्याने आता थेट शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांचे आधार नोंदणीसह अपडेट केले जाणार आहे.

- संजीवन दिवे, शिक्षणाधिकारी, (पंचायत समिती, श्रीरामपूर). 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If the child's Aadhaar card is not updated, many benefits will be lost