esakal | तुम्ही मासे खाता, तर सावधान...कारण अशी होतेय मासेमारी
sakal

बोलून बातमी शोधा

If you eat fish, be careful ...

महिनाभरापासून नगर जिल्ह्यातील मुळा नदीपात्रातील पाण्यात अवैध, विषारी मासेमारी सुरू आहे. आंग्रेवाडी ते मुळा जलाशयादरम्यान नदीकाठावर मृत पावलेले छोटे मासे पसरलेले दिसतात.

तुम्ही मासे खाता, तर सावधान...कारण अशी होतेय मासेमारी

sakal_logo
By
विलास कुलकर्णी

राहुरी : कोण कशात, काय भेसळ करीन हे सांगता यायचं नाही. प्रत्येक ठिकाणी भेसळ सुरू आहे. अन्न-धान्य, तेलात भेसळ होत असल्याची उदाहरणे काही कमी नाहीत. आता मांसाहारातही भेसळ होत आहे. अगद आपल्या ताटात असलेले मासेही आपले आरोग्य खराब करू शकतात. कारण मासेमारी करताना बहुतांशी ठिकाणी विषारी अौषधे व स्फोटकांचा वापर केला जातो.

कोरोनाच्या लॉकडाउनमुळे प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फायदा घेऊन, महिनाभरापासून नगर जिल्ह्यातील मुळा नदीपात्रातील पाण्यात अवैध, विषारी मासेमारी सुरू आहे. आंग्रेवाडी ते मुळा जलाशयादरम्यान नदीकाठावर मृत पावलेले छोटे मासे पसरलेले दिसतात. अशा मासेमारीमुळे पिण्याचे पाणी दूषित होत अाहे. मृत मासे खाल्ल्याने आरोग्यावर घातक परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे विषारी मासेमारी रोखण्याचे आव्हान प्रशासनापुढे उभे ठाकले आहे. 

आंग्रेवाडी, शेरी, चिखलठाण, म्हैसगाव, वावरथ, जांभळी, दरडगाव थडी, चिंचाळे, कुरणवाडी, जांभूळबन, वरवंडी, बारागाव नांदूर येथे मुळा नदीत अवैध विषारी मासेमारीने जोर धरल्याचा आरोप होत आहे.

हेही वाचा - क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेच्या मामासोबत झालं असं...सगळेच हळहळले

जिलेटिनच्या साह्याने मासेमारी केली जाते. अगोदर माशांना खाद्य टाकले जाते. मासे जमा झाल्यावर जिलेटिन कांडी पेटवून फेकली जाते. त्या स्फोटाने हजारो मासे जागीच ठार होतात. छोटे मासे गोळा केले जात नाहीत. तीनशे ग्रॅमच्या पुढील मासे गोळा करून विक्रीसाठी पाठविले जातात. मृत छोटे मासे पाण्यावर तरंगत नदीकाठावर पसरतात. 

तास-आंग्रेवाडी पुलाजवळ बुधवारी सकाळी अकरा वाजता मुळा नदीकाठावर मृत माशांचा सडा पाहिला. जिलेटिन व विषारी औषधाने मासेमारी अनेक दिवसांपासून सुरू आहे. 
- विलास गागरे, माजी सरपंच, म्हैसगाव 

एका महिन्यापासून विषारी मासेमारी सुरू आहे. होडीने नियमित मासेमारी करणारे असा प्रकार करत नाहीत. ट्यूबच्या साह्याने मासेमारी करणाऱ्या टोळ्या आहेत. त्यांच्यावर संशय आहे. 
- अण्णासाहेब सोडनर, ग्रामस्थ, वावरथ 

मुळा नदीकाठावर मृत माशांच्या छायाचित्रासह विषारी मासेमारीची तक्रार पोलिस निरीक्षकांकडे केली होती; परंतु कोणतीही कारवाई झाली नाही. 
- ज्ञानेश्वर बाचकर, माजी सरपंच, वावरथ-जांभळी 

विषारी मासे वारंवार खाल्ल्याने मेंदूवर परिणाम, विस्मृती, झोप न लागणे, तसेच गिळण्यास, बोलण्यास त्रास होणे, पचनक्रिया व मूत्रपिंडाचे आजार संभवतात. 
- डॉ. नलिनी विखे, तालुका आरोग्य अधिकारी, राहुरी