डॉ. शंकरप्रसाद गंधे याला बेड्या... बेकायदा गर्भपाताचे कारण... 

 Illegal abortion; Crimes against doctor
Illegal abortion; Crimes against doctor

नगर तालुका : जखणगाव (ता. नगर) येथील डॉक्‍टर असलेल्या तथाकथित समाजसेवकाने गर्भलिंगनिदान करून बेकायदा गर्भपात केल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने त्याला अटक केली आहे. या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. डॉ. शंकरप्रसाद (सुनील) दिगंबर गंधे (वय 50, रा. जखणगाव, ता. नगर) असे या डॉक्‍टरचे नाव आहे. सोमवारी रात्री उशिरा ही कारवाई झाली. 

नगर तालुक्‍यातील जखणगाव येथील गंधे हॉस्पिटलमध्ये एका महिलेचा बेकायदा गर्भपात केला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने काल (सोमवारी) रात्री नऊ वाजता जखणगाव येथील गंधे हॉस्पिटलवर छापा घातला, तेव्हा हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटरसमोरील खोलीमध्ये एक महिला झोपलेली होती. विचारले असता तिने यास्मीन शकील पटेल असे नाव सांगितले. येथे काय चालू आहे, असे विचारले असता तिने, "तुम्हाला काय करायचे आहे,' असा प्रतिप्रश्‍न केला. तेथे उपस्थित डॉक्‍टरला नाव विचारले असता त्याने, "शंकरप्रसाद गंधे,' असे सांगितले. त्याच्याकडे विचारपूस केली असता, "लीगल प्रोसिजर सुरू असून, आमच्याकडे सर्व कागदपत्रे आहेत,' असे त्याने सांगितले. पोलिस पथकाने हा प्रकार पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या कानावर घातला. त्यानंतर सुमारे दहा वाजता जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर व त्यांचे पथक जखणगाव येथे गंधे हॉस्पिटलमध्ये आले. त्यांनी संपूर्ण हॉस्पिटलची पाहणी केली आणि गर्भपात केलेल्या संबंधित महिलेच्या गर्भाचे तुकडे एका प्लॅस्टिकच्या पिशवीत घेतले. संबंधित महिलेचा गर्भपात बेकायदा झाला आहे. या डॉक्‍टरकडे गर्भपाताचा कोणताही परवाना (लायसन्स) नाही. संबंधित महिलेला गर्भपात होण्याचे औषध देऊन गर्भपात करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत नगर तालुका पोलिसांना माहिती मिळाल्यावर पोलिस उपनिरीक्षक धनराज जारवाल पथकासह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून ऑपरेशन करण्याचे, गर्भपात करण्याचे साहित्य व गर्भाचे तुकडे जप्त केले. या वेळी डॉ. शंकरप्रसाद गंधे याला, "तुमच्याकडे गर्भपात करण्याचा परवाना आहे काय,' अशी विचारणा केली असता त्याने नकारार्थी उत्तर दिले. डॉ. गंधे याने बेकायदा गर्भपात केल्याची खात्री झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. 

पोलिस कॉन्स्टेबल कमलेश हरिदास पाथरूट यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित आरोपी डॉ. शंकरप्रसाद गंधे याला आज दुपारी जिल्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने चार (ता. 26 पर्यंत) दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. ही कारवाई पोलिस हेडकॉन्स्टेबल विष्णू घोडेचोर, विजय ठोंबरे, सचिन अडबल, सचिन कोळेकर, मयूर गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com