पोलिस प्रशासनाच्या डोळ्यासमोर होतेय माफियांकडून ‘याची’ वाहतूक

विलास कुलकर्णी 
Saturday, 22 August 2020

म्हैसगाव येथे दुर्गम डोंगराळ भागात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक जोमात सुरू आहे.

राहुरी (अहमदनगर) : म्हैसगाव येथे दुर्गम डोंगराळ भागात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक जोमात सुरू आहे. महसूल खात्याची परवानगी, सरकारची रॉयल्टी भरली नसतांना हजारो ब्रास मुरूम उत्खनन व वाहतूक झाली आहे. 

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गौण खनिज माफियांनी डोंगर सपाट करण्याचा सपाटा लावला आहे. जेसीबी मशीनद्वारे मुरुम भरुन, पाच- सहा डंपर दिवस- रात्र खेपा करीत आहेत. भरधाव वेगाने जाणारे पाच ब्रासपेक्षा जास्त क्षमतेचे अवाढव्य डंपर प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकवित आहेत.

म्हैसगाव येथे सध्या एका खाजगी मालकीच्या क्षेत्रात गौण खनिज उत्खनन व वाहतूक सुरू आहे. तेथे उत्खनन व वाहतुकीस सरकारची परवानगी घेतलेली नाही. महसूल खात्याकडे रॉयल्टी भरलेली नाही. हजारो ब्रास मुरूम उचलण्यात आला आहे.

लाखो रुपयांचा महसूल बुडवून गौण खनिजाची चोरी सुरू आहे. या भागातील मंडलाधिकारी कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने, महसूल प्रशासनाचे काहीसे दुर्लक्ष झाले. परंतु, पोलिस प्रशासनाच्या डोळ्यासमोर गौण खनिजाची लुट सुरु आहे. त्याकडे पोलिस खात्याचे अर्थपूर्ण दुर्लक्ष माफियाराज वाढण्यास कारणीभूत ठरल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.

मुरूम उत्खनन झालेल्या ठिकाणांचे पंचनामे करून, महसूल खात्यातर्फे संबंधित गौणखनिज माफियावर कायदेशीर व दंडात्मक कारवाई करावी. अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

म्हैसगाव येथे खाजगी क्षेत्रात गौण खनिज उत्खनन व वाहतूक सुरू असल्याची माहिती समजली आहे. संबंधितांनी रॉयल्टी भरलेली नाही. मुरूम उत्खनन व वाहतुकीचे परवानगी घेतलेली नाही. संबंधित ठिकाणाचा पंचनामा करून, दंडात्मक कारवाईसाठी जबाबदारी निश्चिती केली जाईल. 
- दत्तात्रेय गोसावी, मंडलाधिकारी, ताहाराबाद महसूल मंडळ 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Illegal mining at Mhasgaon in Rahuri taluka