कोरोनामुळे आलं आयुर्वेदाला डिमांड...हा काढा वाढवतो प्रतिकार शक्ती

Importance of Ayurveda due to Corona disease
Importance of Ayurveda due to Corona disease

श्रीरामपूर : कोरोनामुळे घरोघरी सध्या आयुर्वेदिक काढ्याला पसंती मिळत आहे. आयुर्वेदिक काढा घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. कोरोनाच्या कहरात कामानिमित्त घराबाहेर पडणारे अनेकजण नियमित काढा घेत आहेत. 

काढ्याला आयुर्वेदात महत्त्व आहे. आधुनिक काळात त्याकडे काहीसे दुर्लक्ष झाले होते. मात्र, सध्या कोरोनाच्या धास्तीने पुन्हा एकदा आयुर्वेदिक काढ्याला पसंती वाढली आहे. त्यामुळे काढ्यासाठी लागणारी दालचिनी, लवंग, काळी मिरी, कळोंजी, हिरवी विलायची, जायफळ, हळकुंड, जावित्री, सुंठ अशा मसाल्याच्या पदार्थांची विक्री वाढली आहे.

काढ्याच्या साहित्याचा खप 50 टक्‍क्‍यांनी वाढला अाहे. दरात काही अंशी वाढ झाल्याचे येथील मसाल्याचे ठोक विक्रेते धीरज धाडिवाल यांनी सांगितले.

काढ्याच्या साहित्याची पूर्वीही विक्री होत होती; परंतु तो घेणाऱ्यांची संख्या कमी होती. अनेकजण चहा, कॉफीवर भर देत. मात्र, कोरोनामुळे सध्या घरोघरी काढा घेणाऱ्यांची संख्या वाढल्याने, शहरासह ग्रामीण भागात किरकोळ मसाले विक्रेत्यांना चांगले दिवस आले आहेत.

काढ्यासाठी लागणाऱ्या साहित्याची 50 टक्के अधिक खरेदी करून नागरिकांना विक्री केली जात आहे. त्यामुळे काढ्याच्या साहित्याचा खप 50 टक्‍क्‍यांनी वाढला आहे. लॉकडाउनमुळे वाहतुकीमध्ये भाडेवाढ झाल्याने काही वस्तूंच्या दरांत काही अंशी वाढ झाली आहे.

मसाल्याचे अनेक पदार्थ परदेशांतून येत असल्याने त्यांच्या दरात नेहमी चढ-उतार होत असतात. सहा महिन्यांपूर्वी विलायचीच्या दरात वाढ झाली होती; परंतु कोरोनामुळे जनजीवन ठप्प झाल्याने सार्वजनिक कार्यक्रम रद्द झाले. परिणामी, विलायचीचे दर घसरले.

आयुष मंत्रालयाने दिलेल्या सूचनेनुसार काढा घेणाऱ्यांची संख्या वाढली. काढ्यासाठी आवश्‍यक असलेल्या मसाल्याच्या पदार्थांचा खप 50 टक्‍क्‍यांनी वाढला. पूर्वी महिनाभरात एक किलो लवंग विकणारा किरकोळ विक्रेता दुकानदार आता महिन्याकाठी दीड किलो लवंग विकत आहे. 

आयुष मंत्रालयाने प्रमाणित केलेला काढा आरोग्यासाठी फायदेशीर आहे. काळी मिरी, दालचिनी, सुंठ, तुळशीची पाने, लवंग, चवीनुसार गूळ किंवा मनुके पाण्यात उकळून प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. दिवसातून एकदा अथवा दोनदा, प्रकृतीनुसार काढ्याचे सेवन करावे. 
- सतीश भट्टड, श्रीरामपूर 

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com