esakal | आता "रुग्ण पाठवा ना रुग्ण' अशी स्थिती... 
sakal

बोलून बातमी शोधा

Increased number of kits for corona test in Shirdi

कोविड रुग्णांसाठी कधीही व्हेंटिलेटरची गरज पडते. त्यासाठी बेड मिळेल का बेड, ही पंधरा दिवसांपूर्वीची तालुक्‍यातील स्थिती आता पुरती बदलून गेली आहे.

आता "रुग्ण पाठवा ना रुग्ण' अशी स्थिती... 

sakal_logo
By
सतीश वैजापूरकर

शिर्डी (अहमदनगर) : कोविड रुग्णांसाठी कधीही व्हेंटिलेटरची गरज पडते. त्यासाठी बेड मिळेल का बेड, ही पंधरा दिवसांपूर्वीची तालुक्‍यातील स्थिती आता पुरती बदलून गेली आहे. त्या वेळी कोविड तपासणी किट हवीत, अशी मागणी गावागावांतून केली जायची. गेल्या चार- पाच दिवसांपासून, किट भरपूर आहेत; मात्र चाचणीसाठी रुग्ण पाठवा ना रुग्ण, अशी उलटी स्थिती झाली आहे. 

तालुक्‍यात रोज दोनशेहून अधिक कोविड चाचण्या होतात. त्यांत बाधित रुग्णांची संख्या कमी होत चालल्याचे आशादायक चित्र दिसते आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण नव्वद टक्‍क्‍यांवर गेले आहे. बाधित रुग्णांमध्ये लक्षणे नसलेल्या किंवा अतिसौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्यादेखील वाढत आहे. त्यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांची टक्केवारी वाढली. कधी कधी एकाच वेळी साठ ते शंभर रुग्ण बरे होऊन बाहेर पडतात. तीन महिन्यांपूर्वी बरे होणाऱ्या रुग्णांची टक्केवारी 46 होती, ती आता दुप्पट झाली. रुग्ण सहज बरे होतात. जाणकारांच्या मते, हे चांगले आणि उत्साह वाढविणारे लक्षण आहे. 
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद म्हस्के म्हणाले, की काल आम्ही वाकडी प्राथमिक आरोग्य केंद्रात छत्तीस रॅपिड चाचणी केल्या. केवळ तीन रुग्ण बाधित आढळले. दहा दिवसांपूर्वी तेथे छत्तीस चाचण्या केल्या तर पंचवीस रुग्ण आढळले होते. संसर्गाचे प्रमाण कमी होत चालले आहे; मात्र फिजिकल डिस्टन्स, मास्क आणि सॅनिटायझरच्या वापराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. 

हेही वाचा : मराठा समाजाची बाजु लोकसभेत आपण स्वत: भक्कमपणे मांडणार : शिवसेना खासदार लोखंडे
ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. स्वाती म्हस्के म्हणाल्या, ""रुग्णांची संख्या कमी झाली आणि रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले, हे गेल्या चार पाच दिवसांच्या आकडेवारीवरून लक्षात येते. हे दिलासादायक चित्र असले, तरी त्यावरून लगेचच निष्कर्ष काढणे घाईचे होईल.'' 

साईसंस्थानचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय नरोडे म्हणाले, ""साईसंस्थानच्या कोविड रुग्णालयात पाच व्हेंटिलेटर आहेत. केवळ एका रुग्णाला सध्या व्हेंटिलेटरवर ठेवले आहे. रुग्णांची संख्या कमी होताना दिसते.'' 

कोविड उपचार केंद्रातील डॉ. संजय गायकवाड म्हणाले, ""रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. फार थोड्या रुग्णांना प्राणवायूची गरज पडते. त्यामुळे यंत्रणेवरचा ताण कमी होत आहे. तालुक्‍यातील गावे पुढीलप्रमाणे ः शिर्डी-16, लोणी खुर्द-24, लोणी बुद्रुक-21, निमगाव-13, साकुरी-16, सावळीविहीर-13, कोऱ्हाळे-11. 

खासदार सदाशिव लोखंडे यांनी सरकारी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कोविड उपचार यंत्रणेचा आढावा घेतला. त्यात रेमडेसीवीर इंजेक्‍शन, पीपीई किट व ग्लोव्ह्‌ज यांचा तुटवडा जाणवत असल्याने, त्यासाठी तातडीने हालचाल करावी, अशी मागणी अधिकाऱ्यांनी केली.
 

संपादन : अशोक मुरुमकर