केंद्र सरकारविरोधात भारतीय किसान सभेचे आंदोलन

सुनील गर्जे
Thursday, 26 November 2020

भेंडे येथील बसथांब परिसरात नेवासे-शेवगाव महामार्गावर तब्बल तासभर रास्तारोको करण्यात केला.

नेवासे : केंद्र सरकारचे कामगार व कृषी कायदे हे मूठभर उद्योगपतींना तारणारे तर कामगार व शेतकऱ्यांना उध्वस्त करणारे असल्याचा आरोप ज्येष्ठ कामगार नेते बाबा आरगडे यांनी करत केंद्र सरकारने हे लोकशाही विरोधी कायदे त्वरित रद्द करावे अशी मागणी केली. 

केंद्र सरकारच्या कामगार आणि कृषी कायद्यांविरोधात गुरुवारी (ता. 26) रोजी भेंडे (ता. नेवासे) येथे अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने ज्येष्ठ कामगार नेते बाबा आरगडे, ऍड. बन्सी सातपुते, युवा नेते शरद आरगडे, आप्पासाहेब वाबळे यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको आंदोलन करण्यात असले. त्याप्रसंगी आरगडे बोलत होते.

भेंडे येथील बसथांब परिसरात नेवासे-शेवगाव महामार्गावर तब्बल तासभर रास्तारोको करण्यात केला. यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या कृषी, पणन आणि कामगार विधेयकाचा निषेधाच्या घोषणा दिल्या. आंदोलकांचे नायब तहसीलदार राजेंद्र गायकवाड, व पोलीस उपनिरीक्षक प्रविण शेवाळे यांनी निवेदन स्वीकारले. 

आंदोलनात हमालांचा सहभाग

आजच्या देशव्यापी संपात नेवासे तालुक्यातील बाजार समित्यांचे सर्व हमाल सहभागी झाले होते. यावेळी हमाल संघटनेच्या वतीने मार्केट कमिट्या बरखास्त करणाऱ्या कायद्याची अमलबजावणी करण्यात येऊ नये. माथाडी कामगार कायद्याची अमलबजावणी करावी आदी मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार राजेंद्र गायकवाड यांना देण्यात आले. 
संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian Kisan Sabha agitation against the Central Government