लम्पी स्कीन आजारामुळे गर्भपात होण्याची शक्यता; कोरोनाप्रमाणेच जनावारांमध्येही संसर्गजन्य आजार

मनोज जोशी
Wednesday, 2 September 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असतानाच आता काही ठिकाणी जनावरांनाही लम्पी स्कीन डिसीजच्या आजाराने ग्रासले असल्याने पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

कोपरगाव (अहमदनगर) : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असतानाच आता काही ठिकाणी जनावरांनाही लम्पी स्कीन डिसीजच्या आजाराने ग्रासले असल्याने पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. परंतु या संक्रमणाची वेळीच दखल घेवून पशुवैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास १०० टक्के धोका टळू शकतो, असे आवाहन गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी केले.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
परजणे पाटील म्हणाले, लम्पी स्कीन आजार हा प्रामुख्याने गोवंशीय जनावरांना होणारा विषाणुजन्य साथीचा आजार आहे. कॅप्रिपॉक्स या प्रवर्गातील विषाणुमुळे हा आजार बळावतो. देशी जनावरांपेक्षा संकरीत जनावरे या आजाराला लवकर बळी पडतात. दमट वातावरणामध्ये किटकांची मोठी वाढ होते. त्या दरम्यान या रोगाचा प्रादुर्भाव अधिक जाणवतो.

विषेशतः चावणाऱ्या माशा, डास, गोचीड, वेगवेगळे किटक यांच्यामुळे या रोगाचा संसर्ग एका जनावरापासून दुसऱ्या जनावरापर्यंत पोहोचतो. लम्पी रोगामुळे जनावरांच्या मरतूकीचे प्रमाण नगन्य असले तरी दूध उत्पादनात मोठी घट होते. 

गर्भपात किंवा रोगग्रस्त वासरांचा जन्म होण्याची अधिक शक्यता असते. संक्रमण झाल्यानंतर किमान दोन आठवड्यापर्यंत ते जनावरांच्या रक्तामध्ये राहते. मग शरीराच्या इतर भागात त्याचे संक्रमण होत जाते. 

लसिका ग्रंथींना सूज येते. एक आठवडाभर भरपूर ताप येतो. दूध उत्पादन कमी होते. त्वचेवर हळूहळू 10 ते 15 मि. मी. व्यासाच्या गाठी तयार होतात.लम्पी स्कीन हा आजार झुनोटीक रोग प्रकारातील नसल्याने जनावरांपासून माणसांमध्ये त्याचा प्रादुर्भाव होत नाही.

त्यामुळे पशुपालकांनी या आजाराला मुळीच घाबरुन न जाता आजाराची लक्षणे आढळल्यास तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये संपर्क साधून जनावरांना औषधोपचार करुन घ्यावा, जनावरांचे गोठे मुक्त व स्वच्छ ठेवावेत, किटक प्रतिबंधक औषधांची वेळच्यावेळी फवारणी करावी, बाधित जनावरांना निरोगी जनावरांपासून दूर ठेवावे अशा उपाययोजना वेळच्यावेळी केल्यास रोगाचा संसर्ग टाळण्यास चांगली मदत होऊ शकते.

या संकटाच्या काळात महाराष्ट्र शासनाचा पशुसंवर्धन विभाग, पशुधन विकास अधिकारी तसेच बायफ संस्थेचे कृत्रिम रेतन तंत्रज्ञ यांनी या रोगासंदर्भात पशुपालकांना मार्गदर्शन व मदत करण्याची गरज आहे असे आवाहनही परजणे यांनी केले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Infectious diseases have been reported in animals such as corona