हप्ता आला; पण कामांचा आदेश नाही 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

चौदाव्या वित्त आयोगाचा कालावधी मागील वर्षी समाप्त झाला. आता चालू आर्थिक वर्षापासून पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी पंधराव्या वित्त आयोगामधून ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना विविध विकासकामांसाठी निधी मिळणार आहे.

नगर  : पंधराव्या वित्त आयोगामधून 2020-21 या कालावधीसाठी केंद्र शासनाकडून राज्याला एक हजार 456 कोटी 75 लाखांचा निधी प्राप्त झाला. त्यातून जिल्हा परिषदेला पहिल्या हप्त्याचे 85 कोटी 39 लाख 67 हजार वर्ग करण्यात आले आहेत. निधी प्राप्त झाला असला, तरी कामे नेमकी कोणती करायची, हा अध्यादेश मात्र देण्यात आला नाही.

अवश्य वाचा ः घरचं झालं थोडं व्याह्याने धाडलं घोडं... अधिकार्यांवर अतिरिक्त कामाचा बोजा

चौदाव्या वित्त आयोगाचा कालावधी मागील वर्षी समाप्त झाला. आता चालू आर्थिक वर्षापासून पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी पंधराव्या वित्त आयोगामधून ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना विविध विकासकामांसाठी निधी मिळणार आहे. या निधीपैकी 80 टक्के निधी हा थेट गावांच्या विकासासाठी ग्रामपंचायतींना वितरित केला जाणार आहे.

हेही वाचा ः शिक्षक बॅंकेचे साडेतीनशे कोटी रुपये पडून

पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेला प्रत्येकी 10 टक्के निधी दिला जाणार आहे. या पहिल्या हप्त्यात नगर जिल्ह्याच्या वाट्याला 85 कोटी 39 लाख 67 हजारांचा निधी प्राप्त झाला असून, त्यातील 68 कोटी 61 लाखांचा निधी जिल्ह्यातील 1318 ग्रामपंचायतींना, तर प्रत्येकी 8 कोटी 53 लाख 97 हजारांचा निधी पंचायत समित्या व जिल्हा परिषदेला मिळणार आहे.

तेराव्या वित्त आयोगाचा निधी जिल्हा परिषद, पंचायत समित्या व ग्रामपंचायती असा मिळत होता. त्यातून रस्ते, अंगणवाड्या, शाळा आदी कामे करण्यात आली आहे. त्यानंतर चौदाव्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतींना देण्यात आला.

ग्रामपंचायतींनी "आपले गाव आपला विकास' आराखडा तयार करून त्यातून कामे केली. यामध्ये पिण्याच्या पाण्याची कामे सर्वाधिक झाली. मात्र, पंधराव्या वित्त आयोगाचा निधी परत तेराव्या वित्त आयोगाप्रमाणे वितरित केला आहे. त्यामुळे या निधीतून आता जिल्हा परिषद सदस्यांसह पंचायत समिती सदस्यांना कामे करणे शक्‍य होणार आहे. 

जिल्हा परिषदेला निधी प्राप्त झाला असून, तो पंचायत समित्या व ग्रामपंचायतींना वितरित करण्यात येणार असला, तरी या निधीतून काय कामे करायची, याच्या मार्गदर्शक सूचना मात्र प्रशासनाला प्राप्त झालेल्या नाहीत. 

पंधराव्या वित्त आयोगाचा पहिला हप्ता प्राप्त झाला असून, तो पंचायत समित्यांसह ग्रामपंचायतींना वितरित करण्यात येणार आहे. मात्र, या निधीतून काय कामे करायची आहेत, याच्या सूचना अद्यापही प्राप्त झाल्या नाहीत. 
- निखिलकुमार ओसवाल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग , अहमदनगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The installment came; But there is no order of works