esakal | अवमानकारक भाषा वापरली तर खपवून घेणार नाही, शिक्षक संघटना आक्रमक

बोलून बातमी शोधा

Insulting language about teacher unions}

शिक्षकांबाबत काही नेते अवमानकारक भाषा वापरीत आहेत. त्यांनी हा उद्योग थांबवला नाही तर धडा शिकवला जाईल, असे आव्हान त्यांनी दिले आहे.

अवमानकारक भाषा वापरली तर खपवून घेणार नाही, शिक्षक संघटना आक्रमक
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर ः जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत एका सदस्याने "शिक्षकांनी घरभाडे भत्ता लाटला' अशी अवमानकारक भाषा वापरली. शिक्षक समितीचे पदाधिकारी असलेले हे सदस्य शिक्षकांविषयी नेहमीच द्वेषपूर्ण भाषा वापरतात. यापुढे हे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा सर्व प्राथमिक संघटनांनी एकत्र येऊन दिलेल्या निवेदनात दिला आहे. 

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात समन्वय समितीने म्हटले आहे, की शिक्षकांविषयी कायम अवमानकारक भाषा वापरणाऱ्या या सदस्यास समज द्यावी, अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल. विद्यार्थी व गुणवत्तेसाठी प्रशासन अथवा पदाधिकाऱ्यांनी सुचविलेली धोरणे आम्ही राबवितो. शिक्षक ऐकतात, याचा अर्थ प्रत्येक सभेत त्यांचा अवमान करण्याचा हक्क कुणाला मिळालेला नाही.

घरभाड्याचा प्रश्‍न राज्य सरकारशी संबंधित आहे. त्याचा कायदेशीर निर्णय असेल तो घेण्यास आमची हरकत नाही; पण कोविड योद्धा म्हणून काम केलेल्या शिक्षकांनी घरभाडे लाटले, असा शब्दप्रयोग करून या सदस्याने शिक्षकांविषयी असलेल्या असूयेचे दर्शन घडविले आहे. 

आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून तीस टक्के रक्कम कपात करण्याच्या ठरावाचे आम्ही स्वागत करतो. याची अंमलबजावणी करताना, तक्रार आलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाची सर्व बाजूने बारकाईने चौकशी करावी. मात्र, इतरांनीही ही नैतिकता बाळगावी, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर डॉ. संजय कळमकर, आबासाहेब जगताप, रा. या. औटी, राजेंद्र शिंदे, प्रवीण ठुबे, संजय धामणे, आबा लोंढे, राजू रहाणे, विकास डावखरे, जावेद सय्यद, राजेंद्र ठोकळ आदींसह शिक्षकांच्या सह्या आहेत.