जलयुक्तच्या कामात "पाणी" मुरलंच, तपासी अधिकाऱ्यापासून कागदपत्रांची दडवादडवी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 4 March 2021

जलयुक्त शिवार योजनेच्या कामातील अनियमतेची चौकशी सध्या सुरू आहे. तपासी अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची दडवादडवी सुरू आहे.

नगर : जलयुक्‍त शिवार योजनेतून जिल्ह्यात झालेल्या कामांबाबत 70 तक्रारी आल्या होत्या. मात्र, याबाबत आयोजित बैठकीसाठी अवघे सहा तक्रारदार उपस्थित राहिले. काहींनी "गैरसमजा'तून तक्रार केल्याचे लेखी दिले; मात्र ते ग्राह्य न धरता, सर्व प्रकरणांची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

कृषी अधिकाऱ्यांनी कामाच्या फायली दाखल करण्यास असमर्थता दर्शविली. "जलयुक्त'च्या कामात मोठी अनियमितता असल्याचे जलयुक्‍त शिवार योजनेच्या चौकशी पथकाचे प्रमुख व सेवानिवृत्त अपर सचिव संजीवकुमार यांनी सांगितले. तसेच, कामातील गैरव्यवहारप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत कारवाईचा इशारा संजीवकुमार यांनी दिला. 

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनामध्ये जलयुक्‍त शिवार योजनेबाबतच्या तक्रारींची चौकशी करण्यात आली. राज्यस्तरीय समितीचे प्रमुख संजीवकुमार, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता संजय बेलसरे, मृदसंधारण विभागाचे अभियंता बी. एन. शिसोदे यांच्या समितीने ही चौकशी केली. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी उदय किसवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप, उपसंचालक विलास नलगे आदी उपस्थित होते. 

सुरवातीलाच भाऊसाहेब तापकिरे यांनी, गैरसमज दूर झाल्याने तक्रार मागे घेतल्याचे पत्र दिले. मात्र, चौकशी समितीने त्यांचे म्हणणे फेटाळले. मूळ तक्रारीतील आरोप व कोणता गैरसमज दूर झाला, अशी विचारणा केली. मात्र, कृषी अधिकाऱ्यांना त्यांची मूळ तक्रार दाखविता आली नाही. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या लीगल सेलचे सदस्य ऍड. सुरेश शिंदे यांनी राशीन (ता. कर्जत) येथील कामाबाबत तक्रार केली होती. सुधीर भद्रे यांनी चिचोंडी पाटील (ता. नगर) येथील कामांच्या निविदा सुटीच्या दिवशी- रविवारी का उघडल्या, असा सवाल केला. संबंधित अधिकाऱ्यांनी तक्रारीची कागदपत्रे न आणल्याने त्यांची खरडपट्टी काढण्यात आली. जामखेड तालुक्‍यातील तीन तक्रारी होत्या; मात्र त्या प्रत्यक्ष कामाबाबत नसल्याने त्यांची चौकशी बंद करण्यात आली. 

अवघे सहा तक्रारदार हजर 
जिल्ह्यातील 70पैकी अवघे सहा तक्रारदार हजर होते. त्यात सुधीर भद्रे, अशोक सब्बन, नीलेश उगले, रेवणनाथ शिंदे, तुळशीदास मुखेकर, देविदास शिंदे हे पहिल्या सत्रात उपस्थित राहिले. अनेकांनी तक्रारी मागे घेतल्या. तसे लेखी म्हणणेही सादर केले. काही जण गैरहजर राहिले. 

मी काही तुमचा जावई नाही... 
काहींनी तक्रारी मागे घेतल्याचे लेखी पत्र अधिकाऱ्यांनी समितीला सादर केले. मात्र, संजीवकुमार यांनी ते फेटाळून लावत, "तुम्ही काहीही पत्रे सादर कराल. हे मी मान्य करणार नाही. संबंधित तक्रारींची चौकशी करणारच! मी काही तुमचा जावई नाही, तुमच्याकडे हुंडा घेण्यासाठी आलेलो नाही. कामाचा आराखडा, ग्रामपंचायतीचा ठराव, कामाचे फोटो, लेखापरीक्षण अहवाल सादर करावाच लागेल,' असा सज्जड इशाराच त्यांनी दिला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Irregularities in water works in Ahmednagar