esakal | नवरात्रौत्सवानिमित्त जागर लोककलेचा, वसा स्त्रीशक्तीचा उपक्रम
sakal

बोलून बातमी शोधा

Jagar folk art Vasa Strishakti initiative on the occasion of Navratri

मराठा सेवा संघप्रणीत महाराष्ट्र प्रदेश जिजाऊ ब्रिगेडतर्फे नवरात्रौत्सवानिमित्त नऊ दिवसीय जागर लोककलेचाः वसा स्त्रीशक्तीचा हा कार्यक्रम होणार आहे.

नवरात्रौत्सवानिमित्त जागर लोककलेचा, वसा स्त्रीशक्तीचा उपक्रम

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर (अहमदनगर) : मराठा सेवा संघप्रणीत महाराष्ट्र प्रदेश जिजाऊ ब्रिगेडतर्फे नवरात्रौत्सवानिमित्त नऊ दिवसीय जागर लोककलेचाः वसा स्त्रीशक्तीचा हा कार्यक्रम होणार आहे. या अंतर्गत बहुजन महानायिकांचे एकपात्री प्रयोग व महाराष्ट्रभरातील विविध सांस्कृतिक लोकगीतांचे जिजाऊ ब्रिगेडच्या महिला सादरीकरण करणार आहेत.

या कार्यक्रमात अनिष्ट रूढी, परंपरा, अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्री शक्तीचे दर्शन या विषयांवर व्याख्यानमालेसह प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आल्याची माहिती संगमनेर तालुकाध्यक्षा सुवर्णा खताळ यांनी दिली आहे.

यात डॉ. दिलीप धाणके (ठाणे) यांचे जिजाऊ पारायण, अहिराणी भाषेतील पहिली डॉक्टरेट मिळवणाऱ्या साहित्यिक व प्राध्यापक डॉ. उषा सावंत (नाशिक) यांच्या जात्यावरच्या ओव्या, लग्न व हळद आणि ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक व मुक्त पत्रकार डॉ. सुभाष देसाई (कोल्हापूर) यांचे अंबाबाई महात्म्य: सत्य व मिथके या विषयावर डॉ. शंकरराव निकम (मुंबई) यांचे स्त्री- पुरुष समानता व स्त्रियांचे धार्मिक अधिकार, कवयित्री व लेखिका प्राचार्या डॉ. अनुराधा वर्‍हाडे यांच्याशी हितगुज तसेच प्रख्यात निवेदिका व जिजाऊ ब्रिगेडच्या राज्य प्रसिद्धीप्रमुख क्षिप्रा मानकर (अमरावती) यांचे समाज घडविण्यासाठी समाज परिवर्तन या विषयावर डॉ. विजय चोरमारे (कोल्हापूर) यांचे वर्तमानातील स्त्रीशक्ती ओळख या विषयावर व्याख्यान होईल. 

ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. साहेबराव खंदारे (परभणी) यांचे देवीबाबत मिथकांचा संबंध यावरील व्याख्यानाने कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. या कार्यक्रमाचे प्रक्षेपण 17 ते 25 ऑक्टोबर 2020 या काळात दररोज दुपारी दोन ते चार वाजता महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेडच्या अधिकृत पेजवर होणार आहे. या उपक्रमात सोमवारी ( ता. 19) संगमनेरातील सदस्या सुवर्णा खताळ (राजमाता जिजाऊ), डॉ. निलम शिंदे (येसूबाई भोसले), डॉ. दीपाली पानसरे (अहल्यादेवी होळकर), डॉ. श्रध्दा वाणी (झलकारी राणी), श्रध्दा देशमुख (सावित्रीबाई फुले), उज्ज्वला देशमुख (रमाई आंबेडकर), वृषाली कडलग (झुंबरबाई अवसक), माधुरी शेवाळे (तानुबाई), वृषाली साबळे (डॉ. रखमाबाई राऊत) या बहुजन नायिकांची पात्रे साकार करणार आहेत. या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याचे आवाहन जिजाऊ ब्रिगेडच्या राज्य सहसचिव राजश्री शितोळे, राज्य कार्यकारिणी सदस्या जयश्री कुटे व डॉ. दिपाली पानसरे, उत्तर नगर जिल्हाध्यक्षा संपूर्णा सावंत आदींनी केले आहे.

संपादन : अशोक मुरुमकर