esakal | रेमडेसिव्हिरविना बरे करणारा जामखेडचा आरोळे पॅटर्न

बोलून बातमी शोधा

आरोळे पॅटर्न जामखेड
रेमडेसिव्हिरविना बरे करणारा जामखेडचा आरोळे पॅटर्न
sakal_logo
By
वसंत सानप

जामखेड ः ""येथील ग्रामीण आरोग्य प्रकल्पात महागड्या औषधांविना पाच हजार रुग्ण ठणठणीत झाले आहेत. यापुढेही ऑक्‍सिजन, रेमडेसिव्हिरची कमतरता जाणवणार नाही. आता उपचारपद्धतीबाबत वेगळा विचार करायला हवा,'' असे मत डॉ. रवी आरोळे यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केले.

रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते (स्व.) डॉ. रजनीकांत आरोळे व (स्व.) डॉ. मेबल आरोळे यांनी पन्नास वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या आरोग्यसेवेचा नंदादीप राज्यात आजही आरोग्यसेवेद्वारे प्रकाश देत आहे. डॉ. रवी आरोळे व डॉ. शोभा आरोळे यांनी कोरोना उपचारासाठी विकसित केलेल्या "डॉ. आरोळे पॅटर्न'ने जामखेड पुन्हा राज्याच्या आरोग्यसेवेत अव्वल असल्याचे पुढे आले आहे. पन्नास वर्षांपूर्वी अशिक्षित महिलांना वैद्यकीय सेवेचे धडे देत ग्रामीण आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न केला.

प्रश्‍न ः कोरोनाची स्थिती कशी आहे?
डॉ. रवी आरोळे ः पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट महाभयंकर आहे. शहरी व ग्रामीण भागात कोरोनाचा झपाट्याने फैलाव होत आहे. त्यामुळे रुग्णांना बेड मिळणेही दुरापास्त झाले आहे. आम्ही मागील वर्षी कोरोना रुग्णांसाठी हाती घेतलेला "ट्रीटमेंट प्लॅन' या वर्षीही पुढे सुरू ठेवला आहे. रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे.

प्रश्‍न ः रेमडेसिव्हिर वापरता का ?
डॉ. रवी आरोळे ः उपचारादरम्यान आम्ही रेमडेसिव्हिर वापरत नाही. रेमडेसिव्हिरमुळे रुग्ण बरे होतात की नाही, हा वेगळा विषय आहे. मात्र, आमच्याकडे येणारे रुग्ण गरीब असल्याने, त्यांना रेमडेसिव्हिर व अन्य महागडी औषधे परवडणारी नाहीत. आयसीएमआर, एम्स, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ वेल्फेअरच्या गाइडलाइननुसार उपचार करतो.

प्रश्‍न ः रुग्णांच्या मानसिक आरोग्यासंदर्भात काय सांगाल?
डॉ. रवी आरोळे ः आम्ही मनातील भीती घालविण्यासाठी नातेवाइकांसमोर रुग्णांवर औषधोपचार करतो. आमचे सोशल वर्कर रुग्ण, त्यांच्या कुटुंबीयांचे "कौन्सिलिंग' करतात. त्यामुळे त्यांची भीती निघून जाते. रुग्णांना आम्ही परिपूर्ण आहार देतो. आमच्याकडे साधारणतः सात ते नऊ दिवसांत रुग्ण बरा होऊन घरी जातो.

प्रश्‍न ः कोविड सेंटरच्या कार्यपद्धतीविषयी काय सांगाल ?
डॉ. रवी आरोळे ः येथे आम्ही संस्था आणि शासन मिळून काम करीत आहोत. आमदार रोहित पवार यांनी पुढाकार घेऊन शासन-संस्था असे हातात हात घालून काम करण्याचा निर्णय घेतला. आमदारांनी येथे जंबो सेंटरही सुरू केले आहे. संस्था आणि शासन एकत्र आल्यावर कसे चांगले काम उभे राहू शकते, याचे उत्तम उदाहरण आम्ही येथे उभे केले आहे.

प्रश्‍न ः भोजनव्यवस्था, मनुष्यबळाविषयी काय सांगाल ?
डॉ. रवी आरोळे ः दानशूर व्यक्तींच्या मदतीने "अन्नपूर्णा' भोजनालय सुरू आहे. समाजातील विविध समाजघटक धान्य व किराणा पुरवतात. त्यातून हे काम सुरू आहे. प्रशासनाकडूनही मदत मिळते.

प्रश्‍न ः नागरिकांना काय संदेश द्याल?
डॉ. रवी आरोळे ः ऑक्‍सिजन, रेमडेसिव्हिरची कमतरता थांबणार नाही. वेगळा विचार करायला हवा. कोरोना झाला तरी घाबरू नका. मात्र तो होऊ नये यासाठी उपाययोजना आवश्‍यक आहे. मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे गरजेचे आहे.