
अधिक माहिती अशी, तक्रारदार याच्या भावाविरुद्ध जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, त्याला अटक होऊन पोलिस कोठडी मिळाली आहे.
नगर : जामखेड पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपीला तपासात मदत करण्यासाठी तक्रारदाराकडून तीस हजार रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून पोलिस उपनिरीक्षकासह एक खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. जामखेड शहरात ही कारवाई झाली.
पोलिस उपनिरीक्षक सज्जन किसन नाऱ्हेडा (वय 36, नेमणूक जामखेड पोलिस ठाणे), खासगी व्यक्ती तुकाराम रामराव ढोले (वय 38 रा. मोरेवस्ती, जामखेड) असे त्यांची नावे आहेत.
अधिक माहिती अशी, तक्रारदार याच्या भावाविरुद्ध जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, त्याला अटक होऊन पोलिस कोठडी मिळाली आहे.
हेही वाचा - नियती किती क्रूर आहे बघा
तक्रारदार याच्या भावाला 169 प्रमाणे गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी आणि गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी वरील दोघांनी एक लाख रुपयांची मागणी केली. तक्रारदाराच्या म्हणण्याप्रमाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज जामखेड शहरात याची पडताळणी केली. त्यात आरोपी उपनिरीक्षक सज्जन नाऱ्हेडा याने आरोपी तुकाराम ढोले याच्या उपस्थितीत तक्रारदाराकडे पन्नास हजार रुपयांच्या लाचेची पंचासमक्ष मागणी केली.
तडजोडीअंती तीस हजार रुपये देण्याचे ठरले आणि ती रक्कम तुकाराम ढोले याच्याकडे हॉटेलमध्ये देण्यास सांगितली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने हॉटेलात सापळा लावला असता तुकाराम ढोले याने उपनिरीक्षक सज्जन नाऱ्हेडा याच्यासाठी तक्रारदाराकडून पंचासमक्ष लाच स्वीकारली. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
ही कारवाई पोलिस उपअधीक्षक हरिष खेडकर, पोलिस निरीक्षक श्याम पवरे, पोलिस कर्मचारी तन्वीर शेख, हारूण शेख, प्रशांत जाधव, रमेश चौधरी, वैभव पांढरे यांच्या पथकाने केली.