जवखेडेचा आज निकाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

murder case

अहमदनगर : जवखेडेचा आज निकाल

पाथर्डी - जवखेडे खालसा तिहेरी हत्याकांडाचा उद्या  गुरुवारी (ता. १९) निकाल लागत आहे. या निकालाकडे पाथर्डीसह राज्याचे लक्ष लागले. प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश सुधाकर यलागड्डा यांच्या कोर्टात निकाल होणार आहे. ता. २० ऑक्टोबर २०१४ ला जवखेडे हत्याकांड होऊन या घटनेत संजय जाधव, त्यांची पत्नी जयश्री व मुलगा सुनील जाधव यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करून त्यांच्या मृतदेहाचे तुकडे विहीर व बोअरवेलमध्ये टाकण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी या संदर्भात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांना मृतदेह काढण्यास दोन दिवस लागले होते.

या तिघांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी जवखेडे खालसातील अनेकांना ताब्यात घेत चौकशी केली. मृत हे दलित समाजाचे असल्याने गावात जातीय तणाव निर्माण झाला होता. या हत्याकांडाच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी एक दिवस बंदही पुकारला होता, तर जाधव कुटुंबाची त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माणिक ठाकरे, खासदार रामदास आठवले, डॉ. प्रकाश आंबेडकर आदी मान्यवरांनी भेट घेत मृत जाधव कुटुंबाला मदतही केली होती. तर या प्रकरणाचा तपास लवकर लागत नसल्याने देशभर त्याचे पडसाद उमटले होते तर अमेरिकेतही या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला.

नार्को चाचणीनंतर पोलिसांनी घटनेच्या ४४ व्या दिवशी या घटनेतील आरोपी मृत संजय जाधवचा पुतण्या प्रशांत, ता. ७ डिसेंबरला अशोक जाधव तर त्याचा भाऊ दिलीप जाधव यांना बेड्या ठोकल्या होत्या. या प्रकरणाची सूत्रे नाशिक विभागाचे तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण साळुंके यांनी हाती घेतली होती. पोलिस निरीक्षक सुभाष अनमलवार ता. २१ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर २०१४ या कालावधीत, पोलिस उपअक्षीक सुनील पाटील, २३ ऑक्टोबर २०१४ ते ११ ऑक्टोबर २०१४ , पोलिस उपअक्षीक वाय. डी. पाटील १२ डिसेंबर २०१४ ते ६ जानेवारी २०१५, पोलिस निरीक्षक शशिराज पाटोळे व सहाय्यक पोलिस निरीक्षक शरद गोरडे ता. ७ जानेवारी २०१५ ते २७ फेब्रुवारी २०१५ तपास केला. आज या घटनेचा निकाल लागत असल्याने सर्वांचे लक्ष लागले आहे.

जवखेडे खालसा-घटनाक्रम

१) संजय जगन्नाथ जाधव (वय ४५), २) जयश्री संजय जाधव (वय ४०), ३) सुनील संजय जाधव (वय १९) यांची ता. २० ऑक्‍टोंबर २०१४ रोजी रात्री नऊ वाजता हत्या झाली. संजय जाधव हे गवंडी काम करत होते. तर त्यांची पत्नी जयश्री ही मजुरी करत होती. त्यांचा एकुलता एक मुलगा सुनील हा डेअरी डिप्लोमाचे शिक्षण घेत होता.

अशी फुटली वाचा

संजय जाधव यांचे घर तारीख 21 ऑक्टोबर रोजी बंद होते. संजय जाधव यांच्या घराशेजारी अर्जुन वाघ यांचे घर आहे. जाधव यांचे घर तारीख 21 ऑक्टोबर रोजी बंद होते. अर्जुन वाघ हे गावात गेले होते. त्यावेळेस त्यांना घर बंद दिसले होते. अर्जुन वाघ यांची पत्नी हिराबाई आणि मुलगी आकांक्षा हे काही वेळाने संजय जाधव यांच्या घरी आले. त्यावेळी घराजवळ रक्त सांडलेले दिसले. त्यामुळे त्यांना काहीतरी दुर्घटना घडल्याची शंका आली. याच ठिकाणी संजय जाधव यांचा मोबाईल हँडसेट पडलेला होता.

हिराबाईने या मोबाईलवरून संजयची भावजयी शारदाबाई जाधव यांना फोन केला. शारदाबाईने प्रशांतला घटनास्थळी पाठवले. त्याच वेळी हिरवाईने रक्त सांडले यावरून साप वगैरे चावल्याची शंका उपस्थित करून दवाखान्यामध्ये जाण्यास सुचवले. प्रशांत जाधव हा मित्रांसमवेत तिसगाव आणि शेवगाव येथे दवाखान्यात जाऊन पाहणी करून आला. थोड्या वेळातच घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. या जमावानेही संजय जाधव यांच्या कुटुंबीयांतील सदस्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. परिसरातील दाविद जाधव यांच्या विहिरीमध्ये संजय आणि जयश्री यांचे मृतदेह आढळून आले. सुनीलचा मृतदेह एका बोरवेलमध्ये आढळून आला होता. प्रशांत जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. पाथर्डी पोलिसांनी 30 ऑक्टोबर रोजी प्रशांत जाधवचा पुरवणी जबाब घेऊन या गुन्ह्यात ॲट्रॉसिटी कलम लावले.

राजकीय पक्षांची आंदोलने

या हत्याकांडात आरोपींना अटक न झाल्याने विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटनांनी आंदोलने सुरू केली होती. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त तारीख 6 डिसेंबर 2014 रोजी मुंबई जाहीर सभा घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्याबाबतचे माहिती पत्रकाचे वाटप करण्यात आले होते.

नार्को चाचणी

या हत्याकांडामध्ये आरोपींनी खून केल्यानंतर कोणते स्थळपुरावे पाठीमागे ठेवले नव्हते. त्यामुळे पोलिसांना आरोपींना अटक करण्यासाठी सबळ पुरावे नव्हते. त्यामुळे पोलिसांनी काही संशय व्यक्तींची नार्को चाचणी करण्याचा निर्णय घेतला. पाथर्डी येथील न्यायालयाकडून त्यासाठी परवानगी घेण्यात आली. या संशयित आरोपींमध्ये संजयचा भाऊ दिलीप आणि दोन पुतणे प्रशांत व अशोक यांचाही समावेश होता. या नार्को चाचणीनंतर पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून प्रशांत जाधव याला ता.३ डिसेंबर २०१४ रोजी अटक केली.

आरोपींचे अटकसत्र

प्रशांत उर्फ काळू दिलीप जाधव (वय 29) हा यास ता. 3 डिसेंबर 2014 रोजी रात्री साडेआठ वाजता अटक करण्यात आली. अशोक दिलीप जाधव (वय 24) यास ता. 7 डिसेंबर 2014 रोजी रात्री पावणे बारा वाजता अटक करण्यात आली. आरोपी दिलीप जगन्नाथ जाधव (वय 54) यांना 18 डिसेंबर 2014 रोजी रात्री पावणे अकरा वाजता अटक करण्यात आली.

असे घडले हत्याकांड

ता. २० ऑक्‍टोंबर २०१४ रोजी रात्री नऊ वाजता मारेकरी संजयच्या वस्तीवर गेले होते. त्यांनी संजय आणि जयश्री व सुनील यांना लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करून हातांनी गळे दाबून त्यांनाही ठार केले.

अशी लावली विल्हेवाट

सुनीलचे मुंडके करवतीने कापले. याच पद्धतीने हात-पाय कापून धडा वेगळे केले. संजय आणि जयश्री यांच्या मृतदेहाचे दोन तुकडे केले. मयतांच्या घरासमोरील रक्‍ताने भरलेली चटई, ताडपत्री, तिघांच्या चप्पला, बॅटरी या जवळच असलेल्या दाविद जाधव यांच्या विहिरीत टाकून पुरावा नष्ट केला. हत्याकांडानंतर रक्‍त सांडले, त्या जागेवर माती आणून टाकली.

Web Title: Javkhede Khalsa Triple Murder Verdict Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top