खांडगाव शिवारात 20 ब्रास वाळूसह जेसीबी आणि डंपर जप्त

आनंद गायकवाड 
Friday, 4 December 2020

तालुक्‍यातील खांडगाव येथे तहसीलदार अमोल निकम यांच्या मार्गदर्शनाखाली महसूलच्या गौण खनिज उत्खनन व वाहतूक शोध पथकाने आज पहाटे केलेल्या कारवाईत, एक जेसीबी व डंपर तसेच 20 ब्रास वाळू जप्त केली. 

संगमनेर (अहमदनगर) : तालुक्‍यातील खांडगाव येथे तहसीलदार अमोल निकम यांच्या मार्गदर्शनाखाली महसूलच्या गौण खनिज उत्खनन व वाहतूक शोध पथकाने आज पहाटे केलेल्या कारवाईत, एक जेसीबी व डंपर तसेच 20 ब्रास वाळू जप्त केली. 

हे ही वाचा : ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षणाची मागणी

तहसीलदार अमोल निकम यांच्या गौण खनिज उत्खनन व वाहतूक शोध पथकातील तलाठी योगिता शिंदे, संग्राम देशमुख व संजय शितोळे गस्तीवर असताना त्यांना खांडगाव शिवारातील कालिका माता मंदिरापासून प्रवरा नदीपात्राकडे जाणाऱ्या रस्त्याने अवैध वाळूवाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. हे पथक कारवाईसाठी जात असताना त्यांना खांडगाव शिवारातील संतोष ढगे यांच्या शेतात वाळूच्या साठ्यासह डंपर व जेसीबी सुरू असल्याचे दिसले. 

पथकाने खात्री करण्यासाठी तेथे जावून पाहिले असता त्यांना वाळूने भरलेला डंपर (एम.एच.17 बी.वाय. 2002) व विनाक्रमांकाचा जेसीबी वाळू उपसा व साठवणूकीसाठी वापरण्यात येत असल्याचे दिसले. हा जेसीबी चेतन साकोरे यांच्या तर वाळू वाहतुकीचा डंपर राहुल गुंजाळ यांच्या मालकीचा असल्याची माहिती समजली. पथकाने या दोन वाहनांसह साठा केलेली 20 ब्रास वाळू जप्त केली. जप्त केलेली वाहने पोलिस वसाहतीत लावली आहेत. या वाहनाच्या मालकांवर दंडात्मक कारवाई होणार असल्याची माहिती तलाठी योगिता शिंदे यांनी दिली.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A JCB a dumper and sand have been seized at Khandgaon