
प्रवरा शेतकरी मंडळाने विद्यमान उपसरपंच गणेश कडू वगळता अन्य चौदा नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. जनसेवा मंडळाचे रमेश पन्हाळे व बापू शिंदे वगळता अन्य 13 नवे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
कोल्हार : प्रवरा परिसरातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या सात्रळ (ता. राहुरी) ग्रामपंचायतीत प्रवरा शेतकरी मंडळाचे नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरुण कडू व आमदार राधाकृष्ण विखे पाटील प्रणीत जनसेवा मंडळ यांच्यातील पारंपरिक विरोधाची धार या वेळीही दिसत आहे.
कडू गटाचे उमेदवार विद्यमान उपसरपंच गणेश कडू यांची प्रभाग पाचमधील व माजी उपसरपंच रमेश पन्हाळे यांची प्रभाग तीनमधील लढत प्रतिष्ठेची झाली आहे.
गेल्या पंचवार्षिकमध्ये ग्रामपंचायतीत सत्तांतर होऊन कडू यांच्या नेतृत्वाखालील प्रवरा शेतकरी मंडळाने विखे यांच्या ताब्यातून सत्ता काबीज केली होती. त्याआधी अनेक वर्षे ग्रामपंचायतीवर विखेंचीच सत्ता होती.
हेही वाचा - मंत्री गडाखांकडून विकासाचा मुद्दा, मुरकुटेंकडून भावनेची खेळी
गेल्या पंचवार्षिकमध्ये कडू गटाचे 11 व विखे गटाचे चार सदस्य निवडून आले होते. यंदाची निवडणूक लक्षवेधी ठरण्याचे कारण म्हणजे, थोर स्वातंत्र्यसेनानी, माजी आमदार दिवंगत पी. बी. कडू पाटील यांच्या कम्युनिस्ट पक्षाने विखे पाटील यांच्या प्रस्थापित घराण्याविरुद्ध कायमच संघर्ष केला आहे. त्यामुळे हे गाव पारंपरिक विखेविरोधक म्हणूनच गणले जाते.
याच कारणास्तव विखे पाटील नेहमीच या गावात त्यांच्या समर्थकांची सत्ता येण्यासाठी अट्टहासाने प्रयत्न करतात. त्याचाच एक भाग म्हणून विखे गटाने या निवडणुकीतही पॅनल उभे करून कडू गटासमोर कडवे आव्हान उभे केले आहे.
ग्रामपंचायतीवर विखे गटाचीच सत्ता पुन्हा आणण्यासाठी त्यांचे उमेदवार व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. कडू गटाच्या ताब्यात ग्रामपंचायत असताना, त्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही.
हा प्रचाराचा मुद्दा घेऊन विखे गट मतदारांपर्यंत जात आहे, तर शेतकरी मंडळाने गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासकामांच्या कारभाराचा लेखाजोखा घेऊन मतदारांपर्यंत जाण्यावर भर दिला आहे.
प्रवरा शेतकरी मंडळाने विद्यमान उपसरपंच गणेश कडू वगळता अन्य चौदा नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. जनसेवा मंडळाचे रमेश पन्हाळे व बापू शिंदे वगळता अन्य 13 नवे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अहमदनगर
संपादन - अशोक निंबाळकर