
Akole News : अभयारण्यात आढळले विविध १३० पक्षी
अकोले : भंडारदरा वन्य जीव विभागाच्या सदतिसाव्या वर्धापनदिनानिमित्त आऊल कन्झर्वेशन फाउंडेशनच्या सहकार्याने कळसूबाई- हरिश्चंद्रगड अभयारण्यात पक्षीसर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात अभयारण्यात १३० प्रकारचे पक्षी आढळून आले. तीनही ऋतूंत पक्षीसर्वेक्षण करण्याचा निर्णय वन्य जीव विभागाकडून घेण्यात आला आहे.
वन्य जीव विभागाच्या वर्धापनदिनानिमित्त अकोले तालुक्यातील पश्चिमेला असणाऱ्या कळसूबाई- हरिश्चंद्रगड अभयारण्यात पक्षीसर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये विविध राज्यांसह महाराष्ट्रातूनही १८ पक्षीतज्ज्ञ सहभागी झाले होते.
एकूण १३० प्रकारच्या प्रजातींचे पक्षी यात आढळून आले असून, या पक्ष्यांसाठी कळसूबाई- हरिश्चंद्रगड अभयारण्य सुरक्षित असल्याचे दिसून आले. यापूर्वीही वन्य जीव विभागाच्या वतीने अशाप्रकारचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
मात्र, एखाद्या मानांकित संस्थेला बरोबर घेऊन सर्वेक्षण करण्याची वन्य जीव विभागाची ही पहिलीच वेळ आहे. भंडारदरा धरणाच्या पाणथळ भागातही पक्ष्यांचा वावर वाढलेला दिसून आला.
स्वर्गीय नर्तक, खंड्या, बुलबुल, कापसी घार, बदकांच्या विविध जाती, राखी बगळा, डोंबारी, निळकंठ, नदीसूरज, जंगली लावा, ओरिएंटल टर्टल डव, पिवळी रानगंगा, टाड पाकोळी, बोर्डी, खडक पाकोळी, फुलटोचा, गुलाबी चिल्ली, निलगिरी फुलटोचा, बुरखाधारी हळद्या, राखी कोंबडा,
करकोच्या चोचीचा खंड्या, नकल्या खाटीक, कवड्या खंड्या, मधाळ्या गरुड, साधी घार आदी पक्षी आढळून आल्या असल्याचे सहायक वनसंरक्षक अधिकारी गणेश रणदिवे यांनी सांगितले. या सर्वेक्षणात आऊल कन्झर्वेशन फाउंडेशनचे प्रशांत शिराळे, वन विभागाचे गरेंद्र हिरे, वनक्षेत्रपाल अमोल आडे, डी. डी. पडवळे, रवींद्र सोनार, भास्कर मुठे, रघुवीर कुंवर, चंद्रकांत तळपाडे, महिंद्रा पाटील, मनीषा सरोदे, अनिता साळुंके, संजय गिते, संदीप पिचड, गुलाब दिवे सहभागी झाले होते.
भंडारदरा परिसरात विशेषतः ब्राह्मणी बदक (चक्रवाक) नावाचा पक्षी आढळला आहे. तो रशिया, मंगोलिया देशातील आहे. भंडारदरा धरणात आढळून येणाऱ्या चिलापी माशांचे प्रमाण कमी होऊन इतर माशांचे प्रमाण वाढले, तर आणखी पाणथळ पक्षी या भागात येतील.
- रोहिदास डगळे, पक्षीतज्ज्