
आमदार रोहित पवार आणि त्यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांच्या माध्यमातून 'माझी वसुंधरा अभियाना' अंतर्गत जामखेड शहरांत स्वच्छतेचा जागर सुरू आहे.
जामखेड (अहमदनगर) : कर्जतच्या 'त्या' साठ तरुणांनी जामखेडला सायकलवर येऊन 'स्वच्छतेचा जागर' केला. शहरातील प्रमुख रस्त्यावर स्वच्छतेचे संदेशही दिले. जामखेड शहर स्वच्छ, सुंदर व्हावं अशी त्यांची जिद्द, चिकाटी आणि तळमळ होती. येथील नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे, म्हणून त्यांनी जनजागृती आणि समाजप्रबोधन केले आहे.
अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा
आमदार रोहित पवार आणि त्यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांच्या माध्यमातून 'माझी वसुंधरा अभियाना' अंतर्गत जामखेड शहरांत स्वच्छतेचा जागर सुरू आहे. शहरातील नागरिकांच्या प्रबोधनासाठी नुकत्याच सिने कलाकार अक्षया देवधर उर्फ 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतील कलाकार पाठक बाई व केंद्रशासनाचे स्वच्छतादूत गणेश शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम जामखेड येथे झाला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने कर्जत येथून ६० स्वच्छतादूत सायकलवर जामखेडला आले होते. त्यांनी कर्जत शहरामध्ये स्वच्छतेच्या उपक्रमांमध्ये सहभाग घेतला. या राबवलेल्या उपक्रमांची माहिती जामखेडकरांना सांगून जनजागृती करण्याचे काम केले. तदनंतर हा समूह कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचला. त्यावेळी त्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. त्यांनी प्रबोधनपर निर्माण केलेले हे सर्व वातावरण जामखेडकरांना चांगलेच भावले.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड तर ई-सकाळचे ऍप
या तरुणांमध्ये 58 वर्षांचे कालिदास शिंदे यांना 'प्यारालाईज' झाला आहे. तरीही ते स्वच्छतेचे काम मोठ्या जिद्दीने आणि चिकाटीने करीत आहेत. त्यांच्याबरोबर सेवानिवृत्त झालेले सैनिक सत्यवान शिंदे आयुष्यभर देशाची सेवा केल्यानंतर सामाजिक सेवेसाठी स्वच्छता दूत म्हणून त्यांनी स्वतःला वाहून घेतले आहे. हातावरचे पोट असणारे ताशा वादक राजू पठाण हेही यामध्ये स्वतःला झोकून देऊन काम करीत आहेत.
राजू पठाण हे दररोज सकाळी कर्जत शहरामध्ये ताशा वाजवून सर्वांना जागे करतात आणि स्वच्छतेच्या कामाला घेऊन जातात. त्यांची समाजाप्रती असलेली आस्था आणि स्वच्छतेसाठी काम करण्याची असलेली जिद्द आणि चिकाटी पाहून निश्चितपणे त्यांना विविध स्तरातून सलाम होतो. या चमू बरोबर कर्जतचे मुख्याधिकारी गोविंद जाधव, बीजीएसचे जिल्हाध्यक्ष अशिष बोरा यांचाही सहभाग होता. त्यांनी कर्जतमध्ये स्वच्छतेसाठी घेतलेल्या परिश्रमांची राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
या टिममध्ये पायाने अपंग असलेल्या अरुण माने यांचाही समावेश आहे. मात्र त्यांना जामखेडच्या कार्यक्रमाला येता आले नव्हते. मात्र ते ही नियमित कर्जत शहरातील श्रमदानासाठी योगदान देतात, या सर्वांमुळे नागरिकांना प्रेरणा मिळते आणि आपसूकच त्यांचे हात ही श्रमदानाकडे जातात, असे आशिष बोरा यांनी सांगितले.
जामखेडकरांनी केले स्वागत
कर्जत मधील ६० तरुण ४५ किमी सायकल चालवित स्वच्छतेचे संदेश देत जामखेड शहरात प्रवेश केला. येथील खर्डा चौकांत ही टीम पोहचल्यानंतर जामखेडकरांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी घोषणा देऊन एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बीड रोडलाही स्वागत झाले तेथून हा चमू कार्यक्रमस्थळी दाखल झाला.