नागवडे साखर कारखान्याचे उपाध्यक्ष केशव मगर यांचा तडकाफडकी राजीनामा

संजय आ. काटे 
Wednesday, 23 December 2020

सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष केशव मगर यांनी त्यांच्या पदाचा आज तडकाफडकी राजीनामा देण्याचा निर्णय पत्रकार परिषदेत जाहीर केला.

श्रीगोंदे (अहमदनगर) : सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष केशव मगर यांनी त्यांच्या पदाचा आज तडकाफडकी राजीनामा देण्याचा निर्णय पत्रकार परिषदेत जाहीर केला.

कारखान्याच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा राजीनामा होत असल्याने संचालक मंडळातील नाराजी उघड झाली आहे. यावेळी मगर यांनी कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या कारभारावर तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त करीत गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
याबाबत मगर यांच्या झालेल्या पत्रकार परिषदेत कारखान्याचे संचालक अण्णा शेलार,  पंचायत समितीचे सदस्य जिजाबापू शिंदे,  काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दीपक भोसले, बाळासाहेब काकडे, शांताराम भोईटे, रंगनाथ कुताळ, वैभव पाचपुते हे हजर होते.

मगर म्हणाले, ज्या त्यागातून दिवंगत नेते शिवाजीराव नागवडे यांनी कारखान्याची उभारणी केली,त्याला  तिलांजली देण्याचे काम सध्या विद्यमान अध्यक्ष राजेंद्र नागवडे  करीत आहेत. कारखान्यात साखर विक्री, मळी विक्री यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले असून मर्जीतील लोकांना अध्यक्षांनी महत्त्वाच्या पदावर बसल्याने कारखानाही घोटाळ्याचे केंद्र बनण्याचा थेट आरोप त्यांनी केला. सध्या सुरू असलेला कारभार हा शिवाजीराव बापूंच्या विचाराचा नसून चुकीच्या मार्गाने होत असल्याचे आपल्याला लक्षात आल्यानंतर आपण राजीनामा देण्याचा निर्णय घेत असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान कारखान्याच्या आगामी निवडणुकीबाबत काय भूमिका राहील असे विचारले असता ते म्हणाले मी व मला माझ्या विचाराचे नेते कार्यकर्ते कुठल्याही परिस्थितीत विद्यमान अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्यासोबत राहणार नसून या निवडणुकीबाबत भूमिका लवकरच जाहीर करणार आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Keshav Magar Vice President of Nagwade Sugar Factory resigns abruptly