दवाखान्यात अॅडमिट मैत्रिणीसोबत तो रात्रभर राहिला, सकाळी तिचा नवरा आला...मग काय...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 21 June 2020

काल-परवा ती आजारी पडली. मग तिला दवाखान्यात अॅडमिट करण्यात आलं. नवरा अॅडमिट करून घरी निघून गेला. तिच्यासोबत रात्री कोणीच थांबलं नाही. ती अस्वस्थ होती

श्रीगोंदे : बऱ्याच दिवसांपासून ते एकमेकांना ओळखत होते. त्यातूनच त्यांची मैत्री झाली. परंतु तिचे लग्न झालेले. मग त्या दोघांची मैत्री तिच्या नवऱ्याला कशी मान्य असेल...त्यांच्यातील मैत्रीची शेजारीपाजारीही चर्चा होतीच... मात्र ते म्हणायचे आमची केवळ मैत्री आहे. परंतु लोकांना वेगळंच वाटायचं. त्यातून तिच्या नवऱ्याचा संताप व्हायचा. बायकोच्या मित्राने काल आगळीक केली. मग त्याचा संयम सुटला. त्यातून त्याने हे पाऊल उचललं.

हेही वाचा- मिलिटरीच्या सेवेतून आला नि थेट चोरीच्या धंद्यात उतरला

काल-परवा ती आजारी पडली. मग तिला दवाखान्यात अॅडमिट करण्यात आलं. नवरा अॅडमिट करून घरी निघून गेला. तिच्यासोबत रात्री कोणीच थांबलं नाही. ती अस्वस्थ होती, पुरती घाबरून गेलेली. ही माहिती तिच्या मित्राला समजली. तो लगेच दवाखान्यात गेला. मैत्रिण आजारी असताना कामी यायचं नाही तर कधी, असा त्याचा विचार होता.

रात्रभर तिच्यासोबत थांबला. रात्रीच्यावेळी काही कमी-जास्त झाले तर आपली मदत होईल, अशी त्याची भावना होती. दुसऱ्या त्या महिलेचा नवरा दवाखान्यात आला. बायकोच्या मित्राला तेथे पाहून त्याचा चांगलाच पारा चढला.

त्याने मागचापुढचा कसलाच विचार केला नाही. त्या मित्रावर त्याने सपासप वार केले. मित्राला मारहाण होताच आजारी असलेल्या त्याच्या मैत्रिणीने नवऱ्याला अडवण्याचा प्रयत्न केला.मात्र, तिला लाथा-बुक्क्याने मारहाण केली.

आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास श्रीगोंद्यातील एका खासगी दवाखान्यात हा प्रकार घडला. ती महिला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील एका खेड्यातील तर तिचा मित्र आहे बीड जिल्ह्यातील. गेल्या काही दिवसांपासून तो श्रीगोंद्यात आहे.

जाणून घ्या - याला म्हणणतात भाऊभाऊ, एक झाला उपजिल्हाधिकारी, दुसरा झाला नायब तहसीलदार

मैत्रिणीच्या नवऱ्याने हल्ला केल्यावर ते महाशय थेट पोलिस ठाण्यात गेले. आणि तेथे त्यांनीच ही कहाणी पोलिसांना सांगितली. आमची केवळ शुद्ध मैत्री आहे. परंत तिच्या नवऱ्याला वाटतंय आमचं लफडं आहे. त्यातून त्याने हा हल्ला केला असावा, असे त्याचं म्हणणं आहे. पोलिसांनी त्याच्या मैत्रिणीच्या नवऱ्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Knife attack on wife's friend