कोपरगावकरांचा पाणीप्रश्न हिवाळ्यातच ऐरणीवर, अधिकाऱ्यांनी केली तलावाची पाहणी

मनोज जोशी
Tuesday, 8 December 2020

या पुढील काम लवकरात लवकर सुरु करून पाणीप्रश्न कायमचा निकाली काढण्याचा आमदार काळे यांचा मानस आहे.

कोपरगाव : नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटावा यासाठी पालिकेच्या पाच नंबर तलावाचे काम तात्काळ मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करीत असलेल्या आमदार आशुतोष काळे यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी पाच नंबर साठवण तलावाची पाहणी केली. 

आमदार काळे यांच्या प्रयत्नातून पाच नंबर साठवण तलावाचे प्राथमिक स्वरूपातील खोदकाम पूर्ण झाले आहे. यापुढील कामासाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी आमदार काळे प्रयत्नशील आहेत. त्यासाठी पाच नंबर साठवण तलावाच्या कामाचे अंदाजपत्रक तातडीने तयार करावे, अशा सूचना त्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

या पुढील काम लवकरात लवकर सुरु करून पाणीप्रश्न कायमचा निकाली काढण्याचा आमदार काळे यांचा मानस आहे. त्यासाठी सुरू असलेल्या पाठपुराव्यातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे शाखा अभियंता प्रशांत कदम, उपअभियंता विवेक शेठे, सहायक अभियंता मुकेश धकाते यांनी पुढील कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यासाठी सोमवार (ता. सात) डिसेंबर रोजी समक्ष येवून साठवण तलावाची पाहणी केली. 

नगराध्यक्ष विजय वहाडणे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, संतोष चवंडके, नगरसेवक वीरेन बिरावके, मंदार पहाडे, गौतम सहकारी बॅंकेचे संचालक सुनील शिलेदार, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरम बागरेचा, नवाज कुरेशी, रमेश गवळी, कृष्णा आढाव, प्रशांत सरोदे, दिगंबर वाघ, पाणीपुरवठा अभियंता ऋतुजा पाटील उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Kopargaon, officials inspected the lake