esakal | ‘चहा घेतला तरच पाणी’ आशा पाट्या हॉटेलवाल्यांकडून दिल्या जायच्या
sakal

बोलून बातमी शोधा

Lake work by Rotary Club in Karjat taluka

तो काळ खूप वेगळा होता. दुष्काळाच्या वणव्यात तालुक्यासह शहर होरपळून निघत होते. पाण्याची टंचाई व दुर्भिक्ष हे तर पाचवीलाच पुजले होते.

‘चहा घेतला तरच पाणी’ आशा पाट्या हॉटेलवाल्यांकडून दिल्या जायच्या

sakal_logo
By
निलेश दिवटे

कर्जत (अहमदनगर) : तो काळ खूप वेगळा होता. दुष्काळाच्या वणव्यात तालुक्यासह शहर होरपळून निघत होते. पाण्याची टंचाई व दुर्भिक्ष हे तर पाचवीलाच पुजले होते. राज्यातील दुष्काळी तालुका म्हणून कर्जतची ओळख सर्वदूर पसरली होती. चहा घेतला तरच पाणी आशा पाट्या अथवा तोंडी सूचना हॉटेलवाल्यांकडून दिल्या जायच्या. 

विहिरींनी तळ गाठला होता तर कूपनलिका सताड उघड्या पडल्या होत्या. पाण्याच्या दुर्भिक्षमुळे समर्थ शाळा, कूळधरण रोड परिसरातील नागरिक स्थलांतर करण्याच्या बेतात असताना सर्वांना दिलासा देण्यासाठी रोटरी नावाची आंतरराष्ट्रीय सामाजिक संघटना पुढे आली.

पाणी टंचाईवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी तत्कालीन अध्यक्ष डॉ. संदीप काळदाते पाटील यांच्या नेतृत्वाखाली येथिल रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीने कंबर कसली. तत्कालीन आमदार तथा पालकमंत्री प्रा. राम शिंदे, प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत, सुजाण नागरिक यांच्या सहकार्य, मार्गदर्शन, सूचना या सर्वांमधून लेंडी नाल्यावर समर्थ सागरला मूर्त रूप दिले गेले.

जलक्रांती होत त्या परिसरातील कूपनलिका पुनर्जीवित होत पाणी पातळी जाग्यावर आली. तेथील रहिवासी असलेल्या नागरिक विशेष करून महिलांना आनंद गगनात मावेनासा झाला. तोच समर्थ सागर काल रात्री झालेल्या पावसाने तुडुंब भरून ओसंडून वाहू लागला आहे. सध्या नवरात्र दसरा सण तोंडावर असल्याने महिलांची साफसफाई धुणी भांडी करण्याची सुविधा झाली. तेथून जाणाऱ्या काही महिलांनी समर्थ सागरची खणा नारळाचे ओटी भरली. विधायक आणि सामाजिक कार्यासाठी ही संस्था अग्रभागी असते, त्या संस्थेच्या माध्यमातून अनेक कामे करता आली, असे डॉ. संदीप काळदाते पाटील यांनी सांगितले.

संपादन : अशोक मुरुमकर

loading image
go to top