सुट्टी, लग्नसराईमुळे भाविक लोटले शनिदर्शनासाठी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 3 January 2021

दिवाळीच्या पाडव्याला मंदीराचे दार उघडले. सुरुवातीच्या पंधरा दिवस गर्दीचा ओघ कमी होता. मात्र, एकतीस डिसेंबरपासून कोरोना संसर्गाचा धोका झुगारून गर्दी सुरु झाली आहे.

सोनई : शनिदर्शन व लग्नाच्या मोठ्या तिथीमुळे आज शिंगणापुर-राहुरी रस्त्याला दिवसभर वाहतुक कोंडीची साडेसाती सहन करावी लागली. तीन दिवसात चार लाख भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. कोरोना संसर्गामुळे शनिमंदीर आठ महिने बंद होते. 

दिवाळीच्या पाडव्याला मंदीराचे दार उघडले. सुरुवातीच्या पंधरा दिवस गर्दीचा ओघ कमी होता. मात्र, एकतीस डिसेंबरपासून कोरोना संसर्गाचा धोका झुगारून गर्दी सुरु झाली आहे. काल शनिवारी (ता. 2) रोजी एक लाखाहून अधिक भाविकांनी स्वयंभू शनिमुर्तीचे दर्शन घेतले. 

मोठी लग्नतिथी व शनिभक्तांच्या वाहनामुळे उंबरे, पिंप्रीअवघड, ब्राम्हणी, वंजारवाडी, सोनई व शिंगणापुरात अनेकदा वाहतुक कोंडी झाली. गर्दीचा फायदा म्हणुन गावात व रस्त्यावर दोनशेहून अधिक लटकू कार्यरत होते. दर्शनपथ अनेकदा गर्दीने हाऊसफुल्ल झाले होते. शिर्डी- शिंगणापुर बेकायदा प्रवासी वाहतुक दोन दिवसांपासून दिमाखात सुरु झाली आहे. 

भाविकांची अडवणूक करत असलेल्या लटकूंबाबत कठोर कारवाई सुरु केली आहे. प्रवासी करनाक्‍यावर कायमस्वरूपी बंदोबस्त ठेवून सीसीटीव्ही फुटेज पाहून कारवाई केली जाईल.

- सचिन बागुल, सहायक पोलिस निरीक्षक. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Large crowd of devotees for Shanidarshan