लता दीदींनी शिर्डीत पाहिली सचिनची फटकेबाजी

साईबाबांच्या आरत्या गाऊनही मानधन घेतलं नाही, मनोजकुमार यांची इच्छा केली पूर्ण
Lata Mangeshkar in Shirdi
Lata Mangeshkar in Shirdi sakal
Updated on

शिर्डी : मी ओपन एअरमध्ये कधीच गात नाही. आपला आग्रह आणि योग आला तर साईंच्या आरत्या आवश्य गाईन. अशा शब्दांत कुणाची तरी फर्माईश पूर्ण करण्यासाठी गायला स्पष्टपणे नकार देण्या-या लता दीदी. सचिन तेंडूलकर केवळ माझा आवडता फलंदाज आहे, असे नाही तर मी त्याला मुलगा मानते. अशा शब्दांत मास्टर ब्लास्टर सचिनवरील आपले प्रेम व्यक्त करीत टीव्हीवर त्याची खेळी पहाण्यासाठी वेळ देणा-या दीदी. पाऊणशे वर्षांपूर्वी मातीची घरे आणि छोटे खेडे असलेल्या शिर्डीच्या स्मृतींना उजाळा देणा-या दीदी.

साईबाबांच्या चारही आरत्या गात त्याचे मानधन मंगेशकर ट्रस्टला देणा-या दीदी. साईभक्त अभिनेता मनोजकुमार यांची अपूरी इच्छा पूर्ण करणा-या दीदी. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या अशा विविध सुरेल आणि मखमली आठवणी साईसंस्थानचे आजी-माजी विश्वस्त आणि कर्मच-यांनी आपल्या मनात जपून ठेवल्या आहेत.

राज्याचे मुख्य सचिव द. म. सुकथनकर हे साईसंस्थानचे अध्यक्ष होते. ते विश्वस्त मंडळाच्या बैठकीसाठी येथे आले असताना नेमक्या लता दीदी, ह्रदयनाथ मंगेशकर व उषा मंगेशकर साईदर्शनासाठी शिर्डीत आले.

दर्शन आटोपल्यानंतर सुकथनकर यांनी या भावंडांचा साईमंदिरालगत यथोचित सत्कार केला. चार पाचशे भाविक समोर बसलेले असताना, एका विश्वस्ताने त्यांनी साईभजन गाण्याची फर्माईश केली. उपस्थितांनी टाळ्यांचा गजर केला. एका हाताने पदर सावरत दीदींनी माईक घेतला. त्या कुठले भजन गातात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले. निरव शांतता पसरली. दीदी म्हणाल्या, मी ओपन एअरमध्ये कधीच गात नाही. आग्रह आणि योग असेल तर साईंच्या आरत्या आवश्य गाईन.

योगायोग असा माजी आमदार कै. जयंत ससाणे साईसंस्थानचे अध्यक्ष झाले आणि दीदी पुन्हा साईदर्शनासाठी शिर्डीत आल्या. याबाबतची आठवण सांगताना साईसंस्थानचे विश्वस्त सुरेश वाबळे म्हणाले, सभागृहात आम्ही दीदींचा सत्कार केला. माजी नगराध्यक्ष कैलास कोते व तत्कालीन कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब वाकचौरे उपस्थित होते. ससाणे यांनी दीदींकडे साईंच्या चारही आरत्यांची त्यांच्या आवाजातील ध्वनीमुद्रिका तयार करून देण्याची मागणी केली. त्यांनी होकार दिली, ससाणे यांनी पुढील आठ दिवसांत त्यांच्या सोबत करारदेखील केला. ध्वनीमुद्रिका तयार झाली. धनादेश घेऊन ही मंडळी दीदींकडे गेली. त्यांनी त्यातील संगीतवृंदाचे मानधन कलाकारांना दिले. उर्वरीत रक्कम दिनानाथ मंगेशकर ट्रस्टकडे जमा केली. मी साईंसेवेचे मानधन कसे घेऊं? अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. अर्थातच ही ध्वनीमुद्रिका बेस्ट सेलर ठरली.

संगीतकार पांडूरंग दीक्षित व साईभक्त अभिनेता मनोजकुमार यांनी तयार केलेल्या शिर्डी के साईबाबा या चित्रपटांमुळे शिर्डीची कीर्ती सर्वदूर पसरली. यातील एकाही कलाकाराने मानधन घेतले नाही आणि अवघ्या सहा महिन्यांत हा चित्रपट तयार झाला. मात्र इच्छा असूनही त्यात लता दीदींच्या आवाजातील गाणे देता आले नाही. पुढे ही रुखरूख दीदींनी दुर केली. मनोजकुमार यांनी रचलेले आणि उत्तमसिंग यांनी संगीत दिलेले प्यार करे सब साईसे, साई सबसे प्यार करे हे गाणे दीदींनी गायले. ओमसाईराम या अल्बममधील हे गाणे कमालीचे हिट झाले.

निवृत्त साईमंदिर प्रमुख दिलीप बकरे म्हणाले, साईदर्शन आटोपून दीदी आपल्या भगिनींसह परतीच्या प्रवासासाठी वाहनात बसल्या. विडींज विरोधात एक दिवसीय क्रिकेट सामना सुरू होता. त्यांनी विचारले कोण खेळतोय ?

बकरे म्हणाले, सचिन तुफान फटकेबाजी करतोय.दीदी गाडीतून खाली उतरल्या, येथे टि.व्ही.वर मला मॅच पहाता येईल का अशी विचारणा केली. संस्थानच्या अतिथिगृहात त्यांनी तब्बल विस मिनिटे सचिनच्या चौफेर टोलेबाजीचा आनंद घेतला. जाताना हसून म्हणाल्या, सचिनला मी मुलगा मानते न...

दीदींच्या बालपणची शिर्डी

शिर्डीच्या अलिकडे एक ओढा खळाळून वहायच्या. त्यावर महिला धुणी भांडी करायच्या. साईमंदिराजवळ दोन चार प्रसादाची दुकाने, मातीची काही घरे बस एवढीशी शिर्डी होती. किती बदलतेय ही बाबांची नगरी, टोलेजंग इमारतीत हरवून गेलीय नुसती. येथे आल्या की त्या आपल्या बालपणच्या शिर्डीच्या स्मृतींना अशा शब्दांत आवर्जून उजाळा द्यायच्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com