
यातून अनेकांना रोजगारही मिळेल. कापूस खरेदीमध्ये सर्वांना समान न्याय मिळावा, हे कापूस खरेदी केंद्र शेतकऱ्यांना आधार केंद्र व्हावे, असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले.
कर्जत : 'जिथं शेतकऱ्यांना मदत लागेल तिथं आपण मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. शेतकऱ्यांच्या हितासाठी उभारण्यात येत असलेल्या नवीन व्यवसायासाठीही ताकद देऊ पण कुणी एखाद्यावर अन्याय करत असेल तर त्याची कसलीही गय करणार नाही. या कापूस केंद्रामुळे हमीभाव मिळणार आहे.
यातून अनेकांना रोजगारही मिळेल. कापूस खरेदीमध्ये सर्वांना समान न्याय मिळावा, हे कापूस खरेदी केंद्र शेतकऱ्यांना आधार केंद्र व्हावे, असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले.
तालुक्यातील मिरजगाव येथील छत्रपती जिनिंग अँड प्रेसिंग प्रा. लिमिटेडच्या शासकीय हमीभाव कापूस खरेदी केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
या वेळी राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाचे संचालक अॅड. शिवाजीराव दसपुते, औरंगाबाद येथील विभागीय व्यवस्थापक व्ही. बी. थिगळे, बबन काशीद, सुहास कासार, सुभाष लोंढे, महिपतलाल पटेल, त्रिंबक तनपुरे, तानाजी पिसे, संदीप बोरुडे,छत्रपती जिनिंग अँड प्रेसिंग प्रा. लिमिटेडचे संचालक प्रा दादासाहेब बांदल, राहुल पवार, भाऊसाहेब पवार, ज्ञानेश्वर जगताप,आदी मान्यवर उपस्थित होते.
ते म्हणाले, गेल्या वर्षी अडचणी असूनदेखील हे केंद्र सुरू ठेवण्यात आले होते. राज्यात 100 ते 150 केंद्रे सुरू होणे अपेक्षित असताना फक्त 30 केंद्रे सुरू झाली आहेत.
तालुक्यातील मिरजगाव येथील केंद्र सुरू करताना अनेक अडचणी आल्या. मात्र, आ.रोहित पवारांनी प्रयत्न करून हे केंद्र सुरू केले. सध्या कापसाचा बाजारभाव कमी असला तरी शेतकऱ्यांना हमीभाव मिळणार असल्याने फायदा होणार आहे. या केंद्रावर दोन ते तीन तालुक्यांतून कापूस खरेदी करण्यात येणार आहे.
अँड. शिवाजीराव दसपुते व व्ही. बी. थिगळे आदींनीही मनोगते व्यक्त केली. मागील वर्षी 85 हजार क्विंटल कापूस शेवटपर्यंत खरेदी करण्यात आला. यावर्षी हमी भावाने तब्बल 2 लाख क्विंटलपर्यंत कापूस खरेदीचा मानस असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून प्रा. दादासाहेब बांदल यांनी उपस्थितांचे आभार मानले.
संपादन - अशोक निंबाळकर