एका क्लिकवर मिळेल नोकरी... उत्कर्षच्या अॅपचे मंत्री तनपुरेंच्या हस्ते लॉचिंग

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जुलै 2020

कोरोना काळात परप्रांतीय मजूरांची भासणारी कमतरता आणि कुशल कामगारांचा येणाऱ्या काळात निश्चित तुटवडा भासणार आहे.

नगर ः लॉकडाउनच्या काळात लोकांना नोकरी मिळावी, त्यांना किमान दोन पैसे मिळावेत यासाठी अनेक सामाजिक संस्था पुढे सरसावल्या आहेत. त्यामुळे बऱ्याच लोकांना फायदाही होत आहे. कोणताही मोबदला न घेतला या संस्था हे काम करीत आहेत. त्यातील एक उत्कर्ष प्रतिष्ठान.

समाजाचे काही देणे लागतो या विचारातून उत्कर्ष प्रतिष्ठानची स्थापना झाली. सचिन लवांडे यांच्या संकल्पनेतून सहकाऱ्यांनी मिळून 2012 साली उत्कर्ष प्रतिष्ठानची स्थापना केली.

ज्या शाळेमध्ये धडे गिरवले, त्या शाळेपासूनच उत्कर्ष प्रतिष्ठानच्या विविध उपक्रमांची सुरुवात करण्यात आली. आपण ज्या शाळेच्या प्रांगणामध्ये खेळलो, बागडलो आणि आज आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहिलो. त्याच शाळेच्या व्यासपीठावरून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन पुस्तके देत असताना मनस्वी आनंद होत होता.

हेही वाचा - पारनेरमुळे पेच वाढणार - नगरसेवक राष्ट्रवादीतच राहणार

दरवर्षी जून महिन्यामध्ये शालेय साहित्य वाटपाचे काम आजतागायत अव्याहतपणे चालू आहे. ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्याना दरवर्षी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस वह्यांचे वाटप, लेखन साहित्य, त्याचबरोबर प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, तसेच वृक्षलागवड, वृक्षसंवर्धन यासारखे अनेक उपक्रम प्रतिष्ठानने हाती घेत समाजात एक आदर्श  उभा केला.

पर्यावरण समस्या यांचे जागतिक समस्या म्हणून भेडसावत आहे. या समस्येला तोंड देण्यासाठी झाडे लावणे आणि ती जगविणे हाच एकमेव उपाय आहे. हाच धागा पकडून प्रतिष्ठानच्या वतीने तिसगाव येथील वनपरिक्षेत्रामध्ये जवळपास 200 झाडांची लागवड दरवर्षी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

कोरोना काळात परप्रांतीय मजूरांची भासणारी कमतरता आणि कुशल कामगारांचा येणाऱ्या काळात निश्चित तुटवडा भासणार आहे. रोजगाराच्या या संधीचा फायदा करून घेऊन स्थानिकांना राेजगार उपलब्ध करून देण्यात मानस उत्कर्ष प्रतिष्ठानचा आहे.

एका लिंकवरून आपण आपल्या रोजगाराची संधी निश्चित करू शकतो. त्यासाठी उत्कर्ष प्रतिष्ठान व फाेरकन्स्टो इनकाॅरपाेरॅशन व गार्गी सोलर सिस्टम यांचे संयुक्त विद्यमाने " राेजगार संधी" हे अॅप तयार केले आहे. त्याची लिंक खालीलप्रमाणे त्याचे लाॅंचिंग मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे हस्ते करण्यात आले. या लिंकवरून हे अॅफ डाउनलोड करू शकता. 

https://play.google.com/store/apps/details?id=com.phoenixzone.userdetails

यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन लवांडे, प्रतिष्ठानचे सदस्य हर्षद शिंदे, नितिन लवांडे, मयूर राहिंज, कल्याण लवांडे आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Launching of Utkarsh app by Minister Tanpur