पिंपळगाव फुणगी शिवारात बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद 

विलास कुलकर्णी
Wednesday, 29 July 2020

पिंपळगाव फुणगी येथे काल (मंगळवारी) रात्री बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. 

राहुरी (अहमदनगर) : पिंपळगाव फुणगी येथे काल (मंगळवारी) रात्री बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. 

पिंपळगाव फुणगी येथे प्रवरा नदीच्या परिसरात बिबट्याचा नेहमी वावर असतो. बिबट्याच्या नर-मादी जोडीचा वावर असल्याने, चार दिवसांपूर्वी मच्छिंद्र हुरुळे यांच्या वस्तीमागे वन खात्याने पिंजरा लावला होता. काल सायंकाळी सात वाजता बिबट्या त्यात अलगद अडकला. वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी काल रात्री साडेआठ वाजता त्याला डिग्रस येथील वन खात्याच्या रोपवाटिकेत हलविले. 

पिंपळगाव फुणगी येथे तीन फेब्रुवारी रोजी श्रेया मंजाबापू जाधव या तीन वर्षांच्या मुलीवर बिबट्याने झडप घातली होती. त्यात श्रेया जखमी झाली होती. त्यानंतर मच्छिंद्र रामदास बाचकर (रा. पिंपळगाव फुणगी) यांच्या शेतातील विहिरीत बिबट्या पडला होता. आता पुन्हा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे. या भागात आणखी एक बिबट्या फिरत असल्याचे मच्छिंद्र हुरुळे यांनी सांगितले. त्यामुळे वन खात्याने पुन्हा पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leopard caged in Phungi Pimpalgaon