बिबटेच बिबटे चोहीकडे, गेले पिंजरे कोणीकडे ?

दौलत झावरे
Tuesday, 1 December 2020

पाथर्डीत बिबट्याने गेल्या महिनाभरात तीन चिमुकल्यांचा बळी घेतला. पशुधनाचा फडशा पाडला. आतापर्यंत तीन बिबट्यांना पकडले असले, तरी त्यात नरभक्षक बिबट्या जेरबंद झाला नसल्याचे बोलले जाते. पाथर्डीपाठोपाठ नगर तालुक्‍यातही बिबट्याने शिरकाव केला असून, तालुक्‍यातील अनेकांना बिबट्याने दर्शन दिले आहे. परिणामी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

अहमदनगर : शहराजवळील चांदबीबी महाल परिसरासह नगर व पाथर्डी तालुका, बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्‍यात काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. या बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी होत असताना, वन विभागाचे पिंजरे लावण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
 
पाथर्डीत बिबट्याने गेल्या महिनाभरात तीन चिमुकल्यांचा बळी घेतला. पशुधनाचा फडशा पाडला. आतापर्यंत तीन बिबट्यांना पकडले असले, तरी त्यात नरभक्षक बिबट्या जेरबंद झाला नसल्याचे बोलले जाते. पाथर्डीपाठोपाठ नगर तालुक्‍यातही बिबट्याने शिरकाव केला असून, तालुक्‍यातील अनेकांना बिबट्याने दर्शन दिले आहे. परिणामी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

अहमदनगरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आष्टी तालुक्‍यात बिबट्याने आतापर्यंत तिघांना ठार केले आहे. त्यामुळे नगरसह बीडमधूनही ठिकठिकाणी पिंजरे लावण्याची मागणी होत असून, पिंजऱ्यांची संख्या कमी पडताना दिसत आहे. बिबट्याचा जिल्ह्यातील उत्तर भागातील अकोले, संगमनेर पट्ट्यात मोठ्या प्रमाणात वावर आहे. मात्र, आता या पट्ट्यात बिबटे दिसत नसून, दक्षिणेतील पाथर्डी, नगर तालुक्‍यांत बिबट्यांचे हल्ले वाढले आहेत. त्यामुळे उत्तरेतून दक्षिणेत बिबट्याने स्थलांतर केले की काय, अशी चर्चा आहे. राज्याबाहेरील व्हिडीओ, छायाचित्रे काही जण आपल्याकडे सोशल मीडियातून व्हायरल करीत आहेत. त्यातून अफवांचे पेव वाढले आहे. अफवा पसरविणाऱ्यांवर वन विभागाने कारवाई करणे गरजेचे असताना टाळाटाळ केली जात आहे. 

गेल्या 40 वर्षांत कधी नव्हे, ते बिबट्याचा धुमाकूळ घातला आहे. तालुक्‍यात एकाच वेळी एवढे बिबटे कोठून आले, असा प्रश्‍न निर्माण होत आहे. वन विभागाकडे पिंजरे लावण्याची मागणी करूनही ते दुर्लक्ष करीत आहेत. 
- राजेंद्र भगत, तालुकाप्रमुख, शिवसेना 

राज्यातील विविध भागांत बिबटे पकडल्यानंतर नेमके कोठे सोडले जातात, याचा शोध घेणे गरजेचे आहे. तालुक्‍यात बिबट्यांची संख्या कशी वाढली, हा संशोधनाचा विषय आहे. बिबटे आले की सोडले, याचा शोध घेणे गरजेचे आहे. 
- संदेश कार्ले, सदस्य, जिल्हा परिषद

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leopards have been roaming in Ashti taluka of Beed district for the last few days