कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांमध्ये ग्रामीण रूग्णालय ढेपाळली

दौलत झावरे
Sunday, 13 December 2020

जिल्ह्यातील श्रीरामपूर, कोपरगाव, राजूर, कोतुळ, टाकळी ढोकेश्‍वर, पारनेर, घोडगाव, बोधेगाव या आठ ग्रामीण रुग्णालयात अद्याप एकही कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया झालेली नाही.

नगर ः कुटुंब कल्याण योजनेंतर्गत कुटुंबनियोजन शस्रक्रिया करण्यात जिल्हा परिषदेने आघाडी घेतली असली, तरी ग्रामीण रुग्णालयांचे काम धीम्या गतीने सुरू आहे. जिल्हा रुग्णालयासह दोन उपजिल्हा रुग्णालये व ग्रामीण रुग्णालयांमध्ये कुटुंबनियोजनाच्या अवघ्या 365 शस्रक्रिया झाल्या आहेत.

विशेषत: आठ ग्रामीण रुग्णालयांत तर एकही शस्त्र्रक्रिया झालेली नाही.
जिल्हा परिषदेच्या 96 प्राथमिक आरोग्य केंद्रांसह जिल्हा रुग्णालय, दोन उपजिल्हा रुग्णालये व 23 ग्रामीण रुग्णालयांमध्ये कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रिया होतात. त्यासाठी जिल्हा परिषदेला 24 हजार 719 उद्दिष्ट होते.

जिल्हा परिषदेने नोव्हेंबरअखेर 3232 शस्त्रक्रिया (12 टक्के) केल्या आहेत. दुसरीकडे जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयांना 6053 उद्दिष्टापैकी फक्त 356 शस्त्रक्रिया (सहा टक्के) केल्या आहेत. त्यात जिल्हा रुग्णालयाने 57 शस्त्रक्रिया केल्या आहेत.

हेही वाचा - आमदार बबनराव पाचपुते यांना कोरोनाची बाधा

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कुटुंबनियोजन शस्रक्रिया होत असताना, ग्रामीण रुग्णालयांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसते. कोरोनाच्या प्रादुर्भावातही जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांनी चांगले काम केले.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कुटुंबनियोजनाच्या शस्त्रकिया सुरू झाल्या आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या यंत्रणेसह जिल्हा परिषदेने सर्वाधिक कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रियेत जिल्ह्यात आघाडी घेतली आहे.

जिल्ह्यातील श्रीरामपूर, कोपरगाव, राजूर, कोतुळ, टाकळी ढोकेश्‍वर, पारनेर, घोडगाव, बोधेगाव या आठ ग्रामीण रुग्णालयात अद्याप एकही कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया झालेली नाही. जिल्ह्यातील श्रीगोंदे, कोपरगाव व अकोले प्राथमिक आरोग्य केंद्रांत कमी प्रमाणात कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया झाल्या आहेत.

 

जिल्हा परिषदेच्या सर्वच प्राथमिक केंद्रांमध्ये कुटुंबनियोजन शस्त्रक्रियांबाबत सूचना केल्या आहेत. याबाबतचा आढावा घेण्यात येत आहे.
डॉ. संदीप सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद

कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात करण्याबाबत सूचित केले आहे. याबाबतचा आढावा घेऊन शिबिरे घेण्यात येणार आहेत.
डॉ. सुनील पोखर्णा, शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Less work of rural hospitals in family planning surgeries