जिल्ह्यात लॉकडाउनला मुदतवाढ ; याला मिळाली परवानगी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 30 June 2020

जून महिन्यात जिल्हा प्रशासनाने सलून बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला नाभिक समाजाने जोरदार विरोध केला होता. नाभिक समाजाने केलेल्या आंदोलनाला पालकमंत्री हसन मुश्रीफ व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भेट देऊन सलून दुकाने सुरू होतील असे सांगितले होते. त्यानुसार तीन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सलून दुकाने 30 जूनपर्यंत खुली राहतील असा आदेश दिला होता. तीन दिवसांचाच आदेश असल्यामुळे नाभिक समाजात भीतीचे वातावरण होते.

नगर : राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउनला मुदतवाढ जाहीर केल्या नंतर आज जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनीही जिल्ह्यात लॉकडाउनला मुदतवाढ दिली आहे. गेल्या महिन्याभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाटत आहे. त्यामुळे आता लॉकडाउनमध्ये शिथिलता आणण्या ऐवजी लॉकडाउन महिन्याभरात आणखी कडक होण्याची चिन्हे आहेत. 

जून महिन्यात जिल्हा प्रशासनाने सलून बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला नाभिक समाजाने जोरदार विरोध केला होता. नाभिक समाजाने केलेल्या आंदोलनाला पालकमंत्री हसन मुश्रीफ व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भेट देऊन सलून दुकाने सुरू होतील असे सांगितले होते. त्यानुसार तीन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सलून दुकाने 30 जूनपर्यंत खुली राहतील असा आदेश दिला होता. तीन दिवसांचाच आदेश असल्यामुळे नाभिक समाजात भीतीचे वातावरण होते. गेल्या तीन महिन्यांत केवळ आठवडाभरच सलून दुकाने उघडी राहिल्याने नाभिक समाजाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या संदर्भात नाभिक समाजाने राज्य शासनाकडे विशेष पॅकेजची मागणी केली आहे. आजच्या आदेशामुळे सलून दुकाने अटीशर्तीनुसार आणखी महिनाभर सुरू राहणार आहेत. त्यामुळे नाभिक समाजात आनंदाचे वातावरण आहे. 

जिल्ह्यातील कन्टेन्मेंट व बफर झोन जोडून इतर भागातील दुकाने सकाळी 9 ते 5 यावेळेतच सुरू राहणार आहेत. या कालावधीतच व्यक्‍तींना फिरता येणार आहे. या कालावधी व्यक्‍तिरिक्‍त केवळ अत्यावश्‍यक सेवेतील व्यक्‍तींनाच घराबाहेर पडता येणार आहे. दुचाकीवर एक, तीन व चार चाकीवर एक चालक व दोन प्रवासी तर चार चाकी वाहनात एक चालक दोन प्रवाश्‍यांना जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. कन्टेन्मेंट झोनमधून मात्र कोणालाही बाहेर जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. 

याला मिळाली परवानगी 
सलून दुकाने अटी व शर्तीनुसार सुरू राहणार. क्रीडासंकुले, स्टेडियम आणि इतर सार्वजनिक मोकळ्या जागांना वैयक्‍तिक व्यायामासाठी खुले ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. जिल्ह्यांतर्गत बस सेवा 50 टक्‍के प्रवासी क्षमतेमध्येच चालविता येणार आहे. पेट्रोलपंत 24 तास खुले राहतील. वृत्तपत्र छपाई व वितरणाला परवानगी देण्यात आली आहे. विवाह समारंभात जास्तीत जास्त 50 व्यक्‍तींस उपस्थित राहण्यास परवानगी आहे. 

याला परवानगी नाही 
सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्‍ती एकत्र येण्यास मनाई राहील. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, मद्यपान, पान आणि तंबाखूचे सेवन करण्यास बंदी आहे. सिनेमा हॉल्स, व्यायाम शाळा, क्रीडा संकुले, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, नाट्यगृह, बार, प्रार्थनागृहे आदी ठिकाणे बंद राहतील. सार्वजनिकरित्या एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट व आदरातिथ्य सेवा बंद राहतील. 65 वर्षांपेक्षा जास्त वयाचे व्यक्‍ती, गर्भवती महिला व 10 वर्षांखालील लहान मुलांना अत्यावश्‍यक सेवा व वैद्यकीय कारणाशिवाय सार्वजनिक ठिकाणी येण्यास मनाई राहील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lockdown in the district extended