व्वा रे कारभार, शेतकऱ्यांचे अनुदान आलं पण बँकेकडून चेकच हरवले

राजेंद्र सावंत
Thursday, 8 October 2020

शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी प्रवीण भोर यांची भेट घेऊन अनुदानासाठी साकडे घातले. गहाळ झालेले धनादेश रद्द करून नवीन धनादेश काढून शेतकऱ्यांच्या बॅंकखात्यांत पैसे पाठविल्याचे कृषी अधिकारी भोर यांनी सांगितले. 

पाथर्डी : तालुक्‍यातील सुमारे 50 शेतकरी फळपीक लागवडीच्या अनुदानासाठी कृषी कार्यालयात चकरा मारत आहेत. कृषी अधिकारी कार्यालयाने स्टेट बॅंकेच्या येथील शाखेत 17 जुलै रोजी दिलेले धनादेश बॅंकेकडूनच गहाळ झाल्याने शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत.

शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी प्रवीण भोर यांची भेट घेऊन अनुदानासाठी साकडे घातले. गहाळ झालेले धनादेश रद्द करून नवीन धनादेश काढून शेतकऱ्यांच्या बॅंकखात्यांत पैसे पाठविल्याचे कृषी अधिकारी भोर यांनी सांगितले. 

फळबाग योजनेचे कुशल कामाच्या अनुदानासाठी तालुक्‍यातील शेतकरी गेल्या पाच महिन्यांपासून कृषी अधिकारी कार्यालयाच्या चकरा मारत होते. जुलैमध्ये निधी मिळाला व तुमचे पैसे बॅंकेत पाठविल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सांगितले.

निपाणी जळगाव, आगसखांड, पागोरी पिंपळगाव येथील अनेक शेतकरी बॅंकेत चौकशी करीत होते. निपाणी जळगाव येथील माजी सरपंच अभिजीत गर्जे यांनी तालुका कृषी अधिकारी भोर यांची भेट घेतली असता, स्टेट बॅंकेच्या पाथर्डी शाखेत धनादेश पाठविले होते. मात्र, बॅंक कर्मचाऱ्यांकडून धनादेश गहाळ झाले. आम्ही पुन्हा दुसरा धनादेश दिला आहे. आता तीन ते चार दिवसांत पैसे मिळतील, असे भोर यांनी सांगितले. 

शेतकऱ्यांनी फळबागेचे कामे करून सहा महिने झाले, तरी कृषी विभागाने शेतकऱ्यांना पैसे दिले नाहीत. त्यामुळे रोजगार हमी योजनेच्या कायद्याचे उल्लंघन झाले आहे. याबाबत चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई करावी व शेतकऱ्यांना तातडीने पैसे मिळावेत, अशी मागणी शेतकरी प्रियांका अभिजीत गर्जे यांनी केली. अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lost check from SBI Bank