एका जागेने हुकवली २५ लाखांची लॉटरी

मार्तंड बुचुडे
Thursday, 7 January 2021

तालुक्‍यातील 88 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्याच वेळी लंके यांनी बिनविरोध निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींना 25 लाखांचा विकासनिधी देण्याचे जाहीर केले होते.

पारनेर ः पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील नऊ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. त्यामुळे या गावांना आमदार नीलेश लंके यांनी जाहीर केल्यानुसार, 25 लाख रुपयांचा विकासनिधी मिळणार आहे. मात्र, चार गावांत एका जागेसाठी निवडणूक होत असल्याने, या गावांची लॉटरी हुकली आहे. 

तालुक्‍यातील 88 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्याच वेळी लंके यांनी बिनविरोध निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींना 25 लाखांचा विकासनिधी देण्याचे जाहीर केले होते. त्यासाठी त्यांनी बैठकाही घेतल्या. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. त्यातून तालुक्‍यातील नऊ ग्रापंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या.

त्यात लंके यांच्या हंगे गावासह रांधे, शिरापूर, कारेगाव, पिंपरी पठार, जाधववाडी, भोयरे गांगर्डा, पळसपूर व धोत्रे खुर्द यांचा समावेश आहे. 

हेही वाचा - माजी आमदार कर्डिलेंना गावातच मिळाले चॅलेंज

आता या गावांना लंके यांच्या आश्वासनानुसार 25 लाखांचा विकासनिधी मिळणार आहे. मात्र, तालुक्‍यातील जातेगाव, पाबळ, पठारवाडी व वडगाव दर्या येथे केवळ एका जागेसाठी, तर डिकसळ येथे दोन जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यामुळे या गावांना 25 लाखांचा निधी मिळणार नाही.

लंके यांच्या संकल्पनेस ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही पाठिंबा दिला होता. मात्र, त्यानंतरही हजारे यांच्या राळेगणसिद्धीचीही निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही, हे विशेष! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lottery worth Rs 25 lakh won by one place