
लहानपणापासून ती धाडसी होती. तिच्या या धाडसी वृत्तीचे नातेवाईकांना मोठे अप्रूप वाटत असे. अगदी तरुण वयातच तिने ग्रामपंचायत निवडणूक लढविली. काही कामानिमित्त गावाजवळील नातेवाईकांच्या घरी गेली. तिथेच तिच्या जिंगदीला कलाटणी मिळाली.
नगर : मराठवाड्यातील छोट्याशा गावातील "ती'. लहानपणापासून धाडसी, कष्टाळू. कोणतेही काम असू द्या, नेहमीच आघाडीवर. थेट सरपंचपदाची निवडणूक लढली. मात्र, नंतर तिच्या जीवनात "तो' आला नि आयुष्याची फरफट सुरू झाली. अर्ध्यावरती डाव मोडून "तो' परागंदा झाला. "ती' मनोरुग्ण झाली. नगरच्या अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या मानवसेवा प्रकल्पाने तिच्या जगण्याला पुन्हा उभारी दिली.
माधुरी (नाव बदलले) हिच्या आयुष्याची ही कहाणी. तिचं मूळ गाव मराठवाड्यातील. अगदी लहाणपणापासून ती धाडसी होती. तिच्या या धाडसी वृत्तीचे नातेवाईकांना मोठे अप्रूप वाटत असे. अगदी तरुण वयातच तिने ग्रामपंचायत निवडणूक लढविली. काही कामानिमित्त गावाजवळील नातेवाईकांच्या घरी गेली.
काही दिवस तिथंच राहिली आणि नकळत शेजारी राहणाऱ्या तरुणाच्या प्रेमात आकंठ बुडाली. लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिला पळवून नेले. तो पुण्यात कंपनीत काम करू लागला. आमदनी जास्त नसल्याने तो मित्रांसोबत राहत होता. तिच्यापुढेही पर्याय नव्हता. तिही त्यांच्यासोबतच राहू लागली; पण हे तिला रुचत नव्हते. तिच्या मनाला ठेच पोचली. त्यातून मानसिक आजार वाढत गेला.
आपली प्रेयसी मनोरुग्ण झाल्याचे पाहून त्याने तिच्यावर पुण्यात उपचार करण्याऐवजी नगर येथील जिल्हा रुग्णालयात आणले. दोन दिवस उपचार केल्यावर एके दिवशी अचानक तो गायब झाला. ही बाब लक्षात येताच, रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना कळविले. पोलिसांनी अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या अरणगाव (ता. नगर) येथील मानवसेवा मदत व पुनर्वसन केंद्राशी संपर्क साधला. पोलिसांनी मनोरुग्ण माधुरीला मानवसेवा प्रकल्पात दाखल केले.
मानवसेवा प्रकल्प संस्थेचे अध्यक्ष दिलीप गुंजाळ व कर्मचाऱ्यांनी तिच्यावर उपचार सुरू केले. प्रकृती सुधारल्यावर तिने आयुष्याची फरफट गुंजाळ यांच्यासमोर मांडली. गुंजाळ यांनी मराठवाड्यातील एका तालुका पोलिस ठाण्याशी संपर्क साधून तिच्या कुटुंबाचा शोध घेतला.
हेही वाचा - एकदाच लागवड खर्च, परत फक्त पैसे छापायचे
सामाजिक कार्यकर्त्या अनिता मदने यांना सोबत घेऊन माधुरीला थेट तिच्या गावी कुटुंबासमोर हजर केले. अचानक तिला पाहुन कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिच्या आयुष्यात अखेर स्थैर्य आले.
धक्क्याने आईचा मृत्यू
माधुरी गावातून गायब झाल्यावर तिचा मृत्यू झाल्याची अफवा गावात पसरली होती. त्या धक्क्याने तिच्या आईचा मृत्यू झाला. माधुरी गावात पोचताच, गावकरी गोळा झाले. कुतुहलाने पाहू लागले. काहींनी तिची आस्थेवाईपणे चौकशी केली.
जिल्हा रुग्णालय व पोलिसांमार्फत ती आमच्या संस्थेत आली. उपचारानंतर स्वच्छता, स्वयंपाकाचे काम करू लागली. नंतर तिच्या कुटुंबाचा शोध घेतला. कुटुंबाबरोबर चर्चा करून त्यांचे समपुदेश केले. तिला तिच्या माणसांत पोचविल्याचा आनंद वाटतो.
- दिलीप गुंजाळ, संस्थापक, अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ, अरणगाव , अहमदनगरसंपादन - अशोक निंबाळकर