
घारगाव येथील माधव पंढरीनाथ सोनवणे हे जन्मतः च अंध आहेत.
अकोले (अहमदनगर) : घारगाव येथील माधव पंढरीनाथ सोनवणे हे जन्मतः च अंध आहेत. त्यांनी भंडारदरा परिसरातील सह्याद्रीचे सर्वोच्च शिखर सर केलयं. दिव्यांग असूनही त्यांनी तब्बल ५४०० फुट प्रवास करीत हे शिखर सर केले. त्यासाठी त्यांना त्यांच्या तीन मुलांनी मदत केली.
संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील माधव पंढरीनाथ सोनवणे हे जन्मतःच अंध आहेत. त्यांचा विवाह सिंधुबाई मोरे यांच्याशी १९८९ मध्ये झाला. सिंधुबाई या डोळस असूनही त्यांनी एका दिव्यांग व्यक्तीला आधार देत आपला संसार थाटला. त्या एका शासकीय आश्रमशाळेत स्वयंपाकी म्हंणून कार्यरत आहेत. या दाम्पत्याला तीन मुले असून उच्चशिक्षित आहेत.
दोन इंजिनियर असून एक फायनन्स कंपनीमध्ये आहे. कळसुबाई शिखर सर करण्याची आपल्या दिव्यांग वडिलांची इच्छा मुलांनी पूर्ण करण्याचे ठरविले. कळसुबाई शिखर वडील माधव यांनी सर केले. आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण झाल्याने सर्व कुटुंब आनंदी झाले आहे.
नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सोमवारी सकाळी ९ वाजता सोनवणे यांचा शिखर सर करण्याचा प्रवास सुरु झाला. त्यांची पत्नी सिंधुबाई, मुले प्रथमेश, ऋषिकेश, अविनाश यांच्या मदतीने मुख्य वाटेला लागले. पुणे, नाशिक येथील बरेच पर्यटक तिथे आले होते. सोनवणे हे एकेक टप्पा पार करीत उंच लोखंडी शिडी मार्गापर्यंत पोहोचले. तोल सावरत कधी मुलांचा हात पकडत त्यांनी शिखर सर केले. वाटेत भेटनार्यांनी त्यांच्या जिद्दीचे कौतुक केले. त्यांना शुभेच्छाही दिल्या.
दुपारी तीन वाजता त्यांनी १६४० मीटर उंचीचे (पाच हजार ४०० फुट) उंचीचे शिखर सर केले. दुपारी साडे चार वाजता त्यांनी परतीचा प्रवास सुरु केला. सायंकाळी आठ वाजता ते शिखरावरून ते खाली उतरले. कळसूमातेच्या दर्शनाची आस व जिद्दीने शिखर सर केल्याचा सोनवणे यांना आनंद झाला. हे शिखर सर करताना आपण दिव्यांग आहोत हे सुद्धा ते विसरून गेले होते. आपण पुन्हा दर्शन करण्यासाठी मी पुन्हा येईन म्हणत ते खाली उतरले.
संपादन : अशोक मुरुमकर