
'महाविकास आघाडीने भ्रष्टाचाराचे रेकॉर्ड मोडले'
राळेगणसिद्धी : ‘‘राज्य सरकारने भ्रष्टाचाराचे रेकॉर्डच मोडले आहे. राज्यात कोणतीच कामे झालेली नाहीत. जुन्या कामांवरूनच भांडणे सुरू आहेत. कोणत्या कामाला कोणाचे नाव द्यायचे? ह्यांचे द्यायचे, की त्यांच्या वडिलांचे, असेच सुरू आहे. कोणत्या कामात किती कमिशन घ्यायचे? बदल्यांमध्ये पैसे खायचे, एवढेच सुरू आहे. त्यामुळे हे सरकार किती वर्षे टिकेल, यापेक्षाही राज्याचे होणारे नुकसान खूप मोठे आहे,’’ असा गंभीर आरोप माजी मंत्री गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला.
महाजन यांनी आज राळेगणसिद्धी येथे येऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. याप्रसंगी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘राज्यात सध्या मोठ्या चौकशा व भानगडी सुरू आहेत. भ्रष्टाचाराला तर कोणतीच मर्यादा शिल्लक राहिली नाही. या सरकारने भ्रष्टाचाराचे सर्व विक्रम मोडून काढले. एसटी कर्मचाऱ्यांचा संप गेल्या महिनाभरापासून मिटवता येत नाही, हे सरकारचे अपयश आहे. आम्ही सत्तेत असताना मराठा समाज आंदोलन, ओबीसी आरक्षण मुद्दा, नाशिक येथून निघालेला लाल बावट्याचा मोर्चा, प्रतिभा शिंदे यांचे आंदोलन, असे विविध मोर्चे, आंदोलने राज्य सरकारविरोधात झाले. मात्र, सरकार म्हणून आम्ही त्यांना भेटत होतो.
आमचे मंत्री राजीनामा देत
राज्यातील अनेक मंत्री चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. राज्याच्या गृहमंत्र्यांना जेलमध्ये बसावे लागले आहे. चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले सनदी अधिकारी कुठे आहेत? अनेक मंत्री चौकशीच्या फेऱ्यात आहेत, मात्र कोणावरही कोणतीच कारवाई अथवा त्यांच्या राजीनाम्याची मागणी होताना दिसत नाही. १९९५ मध्ये आमचे सरकार सत्तेवर असताना, मंत्र्यांवर आरोप झाल्यानंतर त्यांनी तत्काळ राजीनामे दिले, असा दावा गिरीश महाजन यांनी केला.
Web Title: Mahavikas Aghadi Breaks Corruption Record
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..