आमदार विखे पाटलांचा मतदारसंघ पोखरण्यासाठी महाविकास आघाडीची रणनीती

सतीश वैजापूरकर
Tuesday, 22 December 2020

राहाता तालुक्‍यातील उर्वरीत तेवीस गावात विखे समर्थकांचे वर्चस्व अधिक आहे. त्यातील बऱ्याच गावात विखे समर्थक एकमेकांच्या विरोधात उभे राहून निवडणुका लढवितात.

शिर्डी ः आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या शिर्डी विधानसभा मतदार संघात ग्रामपंचायत निवडणुकांच्या निमित्ताने महाविकास आघाडीने चाचपणी सुरू केली आहे. राहाता तालुक्‍यातील पंचवीस गावात निवडणुका होत आहेत. त्यातील बऱ्याच ग्रामपंचायतींवर विखे समर्थकांचे वर्षानुवर्षे वर्चस्व आहे. तेथे महाविकास आघाडीचे मंडळ उभे करण्याच्या दृष्टीने हालतचाली सुरू आहेत. 

शिर्डी विधानसभा मतदार संघात समाविष्ट झालेल्या संगमनेर तालुक्‍यातील चौदा ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहे. तेथे आमदार विखे पाटील यांचा गट व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा गट, अशी सरळ लढत होईल. त्यात जेथे अस्तित्व असेल, तेथे थोरात गट राष्ट्रवादी व शिवसेनेला काही जागांपुरती संधी देईल. रामपूरवाडी व शिंगवे ही दोन गावे कोपरगाव विधानसभा मतदारसंघात येतात. तेथे आमदार आशुतोष काळे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या गटात लढत होईल. तिसरे मंडळ कदाचित विखे समर्थकांचे असू शकते. 

हेही वाचा - भाजपला जबर हादरा, दोन मातब्बर नेते गेले काँग्रेसमध्ये

राहाता तालुक्‍यातील उर्वरीत तेवीस गावात विखे समर्थकांचे वर्चस्व अधिक आहे. त्यातील बऱ्याच गावात विखे समर्थक एकमेकांच्या विरोधात उभे राहून निवडणुका लढवितात. जो विजयी होतो, ते विखे गटाचा म्हणून खुर्चीवर बसतो. पराभूत मंडळदेखील विखे समर्थक म्हणूनच पुढे कार्यरत रहाते. या वेळी येथे महाविकास आघाडीचे स्वतंत्र मंडळ उभे करण्याच्या हालचाली सुरू आहेत. 

सुरवातीला खासदार सदाशिव लोखंडे यांनी शिवसेनेच्या इच्छुकांची शिर्डी येथे बैठक घेतली. या बैठकीत शिवसेनेने ग्रामपंचायत निवडणुका महाविकास आघाडीच्या बॅनरखाली लढविण्याचे जाहिर केले. 

कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे पाठबळ लाभलेले सुरेश थोरात यांनीही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांना सोबत घेऊन चाचपणी सुरू केली आहे. राहाता तालुक्‍यातील सर्व पंचवीस ग्रामपंचायतीत महाविकास आघाडीचे मंडळ उभे करण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू केले. त्यादृष्टीने राहाता येथे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक देखील पार पडली आहे. उमेदवारी अर्ज भरून देणे व त्यासाठीची कागदपत्रे गोळा करणे, यासाठी महाविकास आघाडीतर्फे पक्षाने यंत्रणा उभारली जाणार आहे. कॉंग्रेस पक्षाचे सुरेश थोरात, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुधीर म्हस्के व शिवसेनेचे अनिल बांगर यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. प्रत्येक गावात तीन जणांची समिती नेमण्यात आली. या समितीने दिलेल्या अहवालानंतर मंडळातील उमेदवारांची नावे निश्‍चित केली जाणार आहेत. 

कोणीही लढा, दोन्हीही बाजुचे कार्यकर्ते आमचेच 

राहाता तालुक्‍यात अपवाद वगळता जवळपास सर्व ग्रामपंचायतीवर आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे वर्चस्व आहे. त्यांनीही निवडणुका होत असलेल्या सर्व गावातील पदाधिकारी व इच्छुकांची बैठक घेऊन नियोजनास सुरवात केली आहे. काल याबाबत शिर्डी येथे बोलताना खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, की कोविडच्या प्रकोपामुळे निवडणुका बिनविरोध व्हाव्यात, असे आम्हाला वाटते.

अर्थात निर्णय स्थानिक कार्यकर्त्यांनी घ्यायचा आहे. ज्यांना निवडणुका लढवायच्या, त्यांनी त्या लढवाव्यात. शेवटी दोन्ही बाजुचे कार्यकर्ते आमचेच आहेत. ज्या गावांना बिनविरोध निवडणुका व्हाव्यात असे वाटते. त्यांना सहकार्य करण्यासाठी आम्ही तयार आहोत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahavikas Aghadi's strategy to win the constituency of MLA Radhakrishna Vikhe Patil