
केंद्र सरकारच्या आधारभूत किमत योजनेंतर्गत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मक्याला हमीभाव मिळावा, यासाठी बाजार समितीने सहा दिवसांपूर्वी खरेदी केंद्र सुरू केले.
कोपरगाव (अहमदनगर) : केंद्र सरकारच्या आधारभूत किमत योजनेंतर्गत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मक्याला हमीभाव मिळावा, यासाठी बाजार समितीने सहा दिवसांपूर्वी खरेदी केंद्र सुरू केले. मात्र, शासनाचे खरेदीचे बजेट संपल्याने ऑनलाइन पोर्टलच बंद पडले.
त्यामुळे समितीला हे केंद्रही शटडाऊन करावे लागले. केवळ सहा शेतकऱ्यांची 191 क्विंटल मकाखरेदी झाली. 688 शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. उर्वरित शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार आहेत.
शासनाने आधारभूत किमत योजनेंतर्गत 31 डिसेंबरपर्यंत मकाखरेदीचे निर्देश दिले होते. कोणतीही एजन्सी पुढे येत नसल्याने, समितीने स्वतः पुढाकार घेत 29 ऑक्टोबर रोजी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडे केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव पाठविला. मात्र, त्यासाठी आधी 10 लाख रुपयांची अनामत ठेवा, अन्यथा परवानगी देता येणार नाही, असे कळविण्यात आले.
समितीने 20 नोव्हेंबर रोजी अटींची पूर्तता केली. फेडरेशनने 27 नोव्हेंबर रोजी समितीला कळवले. शासनाचे ऑनलाइन पोर्टलचे यूजर आयडी, पासवर्ड येईपर्यंत 7 डिसेंबर उजाडला. दोन कर्मचारी प्रशिक्षणासाठी नगरला गेले.
नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अखेर आमदार आशुतोष काळे व नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी यांच्या हस्ते 10 डिसेंबर रोजी केंद्राचा प्रारंभ झाला. तीन शेतकऱ्यांचे 137, तर 15 डिसेंबरला तीन शेतकऱ्यांची 54 क्विंटल मकाखरेदी करण्यात आली. 16 डिसेंबर रोजी सात शेतकऱ्यांची 181.50 क्विंटल मकाखरेदी केली आणि सायंकाळी पाच वाजता शासनाचे पोर्टल बंद पडले. त्यामुळे 181.50 क्विंटल मका पडून आहे. समितीने जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या, मात्र शासनाचे खरेदीचे बजेट संपल्याने खरेदी बंद करण्यात आल्याचे उत्तर देण्यात आले.
बाजार समितीकडे तब्बल 688 शेतकऱ्यांची मका विक्रीसाठी नोंदणी केली होती. मात्र, शासनाचे पोर्टल बंद पडल्याने समितीला शरणागती पत्करावी लागली. तालुक्यातील बळीराजा हमीभावापासून वंचितच राहिला.
संपादन : अशोक मुरुमकर