अश्रूंची झाली फुले पण फुलांमुळे आले अश्रू; पारनेरमध्ये शेतीसोबच स्वप्नांचाही चिखल

मार्तंड बुचुडे
Monday, 19 October 2020

कोरोना संकटामुळे सध्या मंदिरे बंद आहेत, मोठे अनेक उत्सव रद्द झाले. त्यात अधिक मास आला. नंतर सततच्या पावसाने शेवंती शेतातच सडून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. 

पारनेर ः शेतकऱ्यांनी अश्रू ओघळून फुलांचे ताटवे फुलवले परंतु याच फुलांमुळे पुन्हा शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.पारनेर तालुक्‍याची ओळख गेल्या काही वर्षांपासून "फुलांचे आगार' अशी होत आहे. या वर्षी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा बंद राहिल्याने लागवड कमी झाली. त्यातच सततच्या व अतिपावसामुळे फुलझाडे सडून गेली. 

कोरोना संकटामुळे सध्या मंदिरे बंद आहेत, मोठे अनेक उत्सव रद्द झाले. त्यात अधिक मास आला. नंतर सततच्या पावसाने शेवंती शेतातच सडून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. 

तालुक्‍यात सुमारे तीनशेहून अधिक एकर क्षेत्रावर फुलशेती पिकविली जात होती. बहुतेक ठिकाणची शेती अतिपावसामुळे खराब झाली आहे. हाता-तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला. तालुक्‍यात प्रामुख्याने सुपे परिसरात फुलशेती केली जाते. पारनेरसह अस्तगाव, वाळवणे, मुंगशी, गोरेगाव, सोबलेवाडी परिसरातही काही प्रमाणात लागवड होते. शेवंतीसह गलांडा, झेंडूचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

या शिवाय ऍस्टर, गुलाब, चमेली, जरबेरा यांचीही काही प्रमाणात लागवड होते. या सर्वच प्रकारच्या फुलांना मुंबई, पुण्यासह नागपूर, दिल्ली, कोलकता, हैदराबाद, बंगळुरू आदी ठिकाणांहून मोठी मागणी असते. 

या वर्षी मात्र कोरोनामुळे राज्यात व देशातही लॉकडाउन झाल्याने बाजार बंद होते. ते कधी सुरू होतील, या भीतीपोटी शेतकऱ्यांनी मुळातच फुलझाडांची लागवड कमी प्रमाणात केली. गणेशोत्सव, नवरात्र महोत्सव, तसेच दसरा, दिवाळीच्या काळात फुलांना चांगली मागणी असते.

गणेशोत्सव या वर्षी घरगुती स्वरूपातच साजरा झाला. सध्या नवरात्र महोत्सवही साध्या पद्धतीने होत आहे. शेतकऱ्यांकडे फुलेही कमी प्रमाणात आहेत. दसरा व दिवाळीत फुलांना मागणी वाढेल. बाजारभावही चांगला मिळेल. मात्र, सारखा पाऊस पडत असल्याने फुलशेती वाया गेली आहे. 
सध्या बाजारात शेवंतीला दीडशे ते दोनशे रुपये, तर झेंडू व ऍस्टरला शंभर रुपये प्रतिकिलो भाव आहे. पावसाने नुकसान केले नसते, तर शेतकऱ्यांना चांगली कमाई झाली असती. 

शेवंतीच्या पिकास एकरी साधारण 40 ते 50 हजार रुपये खर्च येतो. पावसाने फुले ओलसर झाली तर चांगला भाव मिळत नाही. चांगला भाव मिळाला व एकरी साडेपाच ते साडेसहा टन उत्पादन झाले, तर खर्च वजा जाता दोन लाखांहून अधिक उत्पन्न मिळू शकते. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Major damage to floriculture in Parner taluka